मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील मुंबईतील गेल्या साडेचार महिन्यांतील सर्वांत कमी रुग्णसंख्येची नोंद सोमवारी झाली. दिवसभरात ४८९ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे रुग्ण वाढीच्या सरासरी दैनंदिन दरातही घट झाली आहे. सध्या हा दर ०.०८ टक्के आहे. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधीही आता ८०२ दिवसांवर पोहोचला आहे. या आधी सर्वात कमी ४६१ रुग्ण १६ फेब्रुवारीला नोंदवले गेले होते.आतापर्यंत मुंबईत सात लाख २५ हजार १६७ रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी सहा लाख ९९ हजार ३४१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच १५ हजार ५५४ रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे. सध्या सात हजार ९४७ सक्रिय रुग्ण आहेत. गेले काही दिवस रोजच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले होते. मात्र सोमवारी १० मृत्यूची नोंद झाली आहे. मृत्युमुखी पडलेल्या सात रुग्णांना सहव्याधी होत्या.मृतांमध्ये सात पुरुष तर तीन महिला रुग्णांचा समावेश होता. पाच मृत झालेले रुग्ण ६० वर्षांवरील होते, तर पाच रुग्ण ४० ते ६० वर्षांमधील होते. दिवसभरात ३० हजार ७३७ चाचण्या करण्यात आल्या. तर आतापर्यंत ७३ लाख २३ हजार १८३ चाचण्या करण्यात आल्या आहेत.
राज्यात ६,७४० नवीन कोरोनाबाधितांची नोंद- मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार सुरू आहे. सोमवारी १३,०२७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर ६,७४० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर ५१ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.- राज्यात आजपर्यंत एकूण ५८,६१,७२० कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०२ टक्के झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्के इतका आहे. आता राज्यात १ लाख १६ हजार ८२७ रुग्ण सक्रिय आहेत. -आजपर्यंतच्या ४,२७,१२,४६० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६१,०४,९१७ (१४.२९ %) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,४२,२५३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.