मुंबईत शंभर दिवसांतील सर्वांत कमी रुग्णवाढ, मंगळवारी ७०० रुग्णांची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 05:52 AM2020-07-29T05:52:44+5:302020-07-29T05:52:58+5:30
मंगळवारी महापालिकेने सर्वाधिक ८,७७६ संशयित रुग्णांची चाचणी केली. यापैकी केवळ सातशे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. गेल्या शंभर दिवसांतील बाधित रुग्णांचा एका दिवसातील हा सर्वांत कमी आकडा असल्याची माहिती मुंबईचे महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेले चार महिने कोरोनारूपी संकटाचा सामना करणाऱ्या मुंबईकरांना अखेर दिलासा मिळत आहे. एकीकडे बाधित रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी ६९ दिवसांवर पोहोचला असताना रुग्णवाढीच्या संख्येत घट होऊ लागली आहे.
मंगळवारी महापालिकेने सर्वाधिक ८,७७६ संशयित रुग्णांची चाचणी केली. यापैकी केवळ सातशे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. गेल्या शंभर दिवसांतील बाधित रुग्णांचा एका दिवसातील हा सर्वांत कमी आकडा असल्याची माहिती मुंबईचे महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली.
कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत सुरू झाल्यापासून दररोज सरासरी १५०० ते १७०० रुग्णांची नोंद होत होती. कोरोनाचा प्रसार नियंत्रणात येण्यासाठी महापालिकेने गेल्या तीन महिन्यांमध्ये अनेक उपाययोजना केल्या. त्यानंतर आता रुग्णांची संख्या सरासरी ११०० ते १२०० पर्यंत खाली आली आहे. मात्र आतापर्यंतच्या सर्वांत कमी बाधित रुग्णांची नोंद मंगळवारी झाली. तसेच कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाणही आता ७३ टक्क्यांवर पोहोचले आहे. तर दैनंदिन सरासरी रुग्णवाढही १.०२ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे.
मुंबईत दररोज सरासरी चार ते पाच हजार लोकांची चाचणी केली जाते. बाधित रुग्णांपर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी महापालिकेने गेल्या काही दिवसांमध्ये चाचणीचे प्रमाण वाढविले आहे.
आरटी पीसीआरबरोबरच अँटिजेन चाचणी तसेच एक्सरेद्वारेही बाधित रुग्णांचा शोध घेण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत मंगळवारी आतापर्यंतची सर्वाधिक तब्बल ८,७७६ लोकांची चाचणी करण्यात आली. आतापर्यंत मुंबईत चार लाख ८५ हजार ५६३ कोरोना चाचण्या झाल्या आहेत. चाचण्यांची संख्या दररोज १० हजारांवर नेण्याचे पालिकेचे उद्दिष्ट आहे.