मुंबईचा नियोजनबद्ध विकास झाला नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:08 AM2021-02-23T04:08:29+5:302021-02-23T04:08:29+5:30
मुख्यमंत्री; पर्यावरण रक्षणासह विकासकामे करण्याची दिली ग्वाही लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोणत्याही नियोजनाशिवाय मुंबई वाढत गेल्याची कबुली देतानाच ...
मुख्यमंत्री; पर्यावरण रक्षणासह विकासकामे करण्याची दिली ग्वाही
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोणत्याही नियोजनाशिवाय मुंबई वाढत गेल्याची कबुली देतानाच या वाढलेल्या मुंबईला आणि येथील लोकसंख्येला आखीवरेखीव, नियोजनबद्ध सुविधा पुरविणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दिली. मुंबईसारख्या गर्दीच्या ठिकाणी विकासकामे करणे एखादे नवीन शहर वसविण्यापेक्षा आव्हानात्मक काम आहे. ही आव्हाने सोडवत मुंबई महापालिका आणि राज्य सरकार काम करत असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
एमएमआरडीएच्या वांद्रे येथील कलानगर जंक्शन उड्डाणपुलाच्या एका मार्गिकेचे उद्घाटन, शिवडी ते वरळी उन्नत मार्ग प्रकल्पाचे भूमिपूजन, बीकेसी सायकल ट्रॅक व पथदर्शी पदपथाचे लोकार्पण तसेच स्मार्ट वाहनतळाचे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब, कौशल्य विकास मंत्री नबाव मलिक, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह स्थानिक आमदार, खासदार, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, अतिरिक्त महानगर आयुक्त के. एच. गोविंदराज तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, यापुढे मुंबईचा सुनियोजित विकास करण्यावर भर देण्यात येईल. मुंबईच्या विकासासाठी पायाभूत सुविधांची कामे सुनियोजितपणे तसेच पर्यावरणाचे जतन करत करण्यावर भर देणार आहे. मुंबईत वाहतूक समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. यावर स्मार्ट पद्धतीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यासाठी पार्किंगची व्यवस्थाही आधुनिक पद्धतीने करावी लागेल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर भर देतानाच ती सर्वांना परवडणारी कशी होईल हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मुंबईसारख्या शहरात आजही सायकल चालवली जाते, यासाठी स्वतंत्र ट्रॅक असणे गरजेचे आहे. ही सर्व विकासकामे करत असतानाच पर्यावरण रक्षण करण्यावरही भर देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी नगरविकास मंत्री आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबईतील या प्रकल्पांमुळे वाहतुकीत मोठी सुधारणा होईल. असा पायाभूत सुविधा उभारणी कामांबरोबरच एमएमआरडीएने कोविड संकटकाळात मोठी कोविड सेंटरही उभारली, हे उल्लेखनीय असल्याचे ते म्हणाले. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नागरिकांना ‘इज ऑफ लिव्हिंग’चा अनुभव घेता आला पाहिजे या दृष्टीने पर्यावरणाचे रक्षण करत या सर्व पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येत असल्याचे सांगितले. तर, आर. ए. राजीव यांनी प्रास्ताविक केले.