मुंबईत गेल्या १० वर्षांतील नीचांकी कमाल तापमानाची नोंद, हवामानातील बदलामुळे मुंबईकर हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 07:46 PM2022-01-23T19:46:59+5:302022-01-23T19:47:13+5:30
धूळीच्या वादळाने मुंबईकरांचा श्वास कोंडला असतानाच दुसरीकडे मुंबईच्या कमाल तापमानाने मुंबईकरांना हुडहुडी भरविली आहे.
मुंबई : धूळीच्या वादळाने मुंबईकरांचा श्वास कोंडला असतानाच दुसरीकडे मुंबईच्या कमाल तापमानाने मुंबईकरांना हुडहुडी भरविली आहे. कारण रविवारी मुंबईचे कमाल तापमान २३.८ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून, गेल्या दहा वर्षांतील हे नीचांकी कमाल तापमान आहे, अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. दरम्यान, धूळीचे वादळ, पाऊस असे बदलते हवामान यास कारणीभूत असून, हवामानात झालेल्या बदलामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी व कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.
Mumbai weather really terrific today ...
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) January 23, 2022
Dusty
Cloudy
Windy
Rainy
Coolest ... pic.twitter.com/TmJXFH4l5e
शहरांचे किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये.
मुंबई २१
जळगाव १४
महाबळेश्वर ११.९
नाशिक १४.८
सातारा १३.६
सोलापूर १५.३
औरंगाबाद १५.४
अकोला १५.७
अमरावती १४.३
बुलडाणा १४.३
गोंदिया १५.६
नागपूर १५.५
वाशिम १२
वर्धा १५.४