Join us

मुंबईत उष्णतेच्या लाटेचा तडाखा कायम; आजचा दिवसही तापदायक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 3:21 AM

रत्नागिरी ४० तर मुंबई ३८ अंश, उष्णतेच्या लाटेमुळे सर्वसाधारण कमाल तापमानात ५ ते ६ अंशाची वाढ नोंदविण्यात आली

मुंबई : कोकणात आलेली उष्णतेची लाट आणखी एक दिवस म्हणजे शनिवारी कायम राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. परिणामी, मुंबईसह कोकणाचा कमाल तापमानाचा पारा आणखी चढणार असून, शुक्रवारी कमाल तापमानाचा पारा ३८.५ अंश सेल्सिअस एवढा नोंदविण्यात आला आहे. कोकणातील शहरांनी तर कहर केला असून, रत्नागिरी येथील कमाल तापमान ४० अंश नोंदविण्यात आले आहे.

उष्णतेच्या लाटेमुळे सर्वसाधारण कमाल तापमानात ५ ते ६ अंशाची वाढ नोंदविण्यात आली. कोकणात हे प्रमाण अधिक आहे. गेल्या २५ वर्षांत रत्नागिरी येथे आतापर्यंतचे तिसरे सर्वाधिक कमाल तापमान शुक्रवारी नोंदविण्यात आले. यापूर्वी १६ मार्च २०११ रोजी ४०.६ तर ८ मार्च २००४ रोजी ४०.२ एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली होती. गुजरातमध्येदेखील उष्णतेची लाट कायम आहे. दुसरीकडे मुंबईच्या कमाल तापमानाने तर कहर केला असून, सलग तिसऱ्या दिवशी कमाल तापमान ३८ अंश नोंदविण्यात आल्याने मुंबईकरांचा घाम निघत आहे.