मुंबई : शिमग्यानंतर कमाल तापमानाचा पारा दिवसागणिक वाढत आहे. सोमवारी मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रातील बहुतांश शहरांसह मुंबईच्या कमाल तापमानाने चाळिशी पार केली. मुंबईचे कमाल तापमान ४०.३ अंश नोंदवण्यात आले. या मोसमातील मुंबईतील हे सर्वाधिक तापमान आहे. अमरावतीत सर्वाधिक ४१.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. वातावरणातील बदलामुळे अरबी समुद्राहून राजस्थानाच्या दिशेकडे वाहणारे वारे पुन्हा पूर्वेकडून खाली पश्चिमेकडे वाहत आहेत. राजस्थानाहून वाहत असलेले हे वारे तापत असून, ते पूर्वेकडून महाराष्ट्रासह मुंबईकडे वाहत आहेत. परिणामी, राज्यातील अनेक शहरांसह मुंबई विशेषत: किनाऱ्यावरील शहरांचे कमाल तापमान ४० अंशांच्या आसपास नोंदविण्यात येत आहे, असे मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र केंद्राचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले.सोमवारचे कमाल तापमानमुंबई ४०.३, अकोला ४१.४, अमरावती ४१.६, औरंगाबाद ३८.४, बुलडाणा ३७.२, चंद्रपूर ४०.२, जळगाव ४०.६, कोल्हापूर ३८.७, मालेगाव ४१, नागपूर ३९.१, नाशिक ३९.१, परभणी ४१.४, पुणे ४०.२, सांगली ३९, सातारा ३९.१, सोलापूर ४०.७, वर्धा ३९.९, यवतमाळ ४०.(अंश सेल्सिअसमध्ये)
पारा चाळिशीपार; मुंबईसह राज्यात उष्णतेची लाट, अमरावतीत सर्वाधिक ४१.६ अंश सेल्सिअस
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 1:40 AM