लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईसह राज्यात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. हवामानात बदल होत असतानाच आता मुंबईच्या कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात येत असून, हे कमाल तापमान ३४ ते ३६ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. समुद्राहून मुंबईकडे वाहणारे वारे स्थिर होण्यास दुपार होत आहे. त्यामुळे दुपारी हे वारे तापत आहेत. परिणामी तापमानात वाढ होत आहे, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली.
मुंबईचे किमान तापमान देखील २१ अंशांच्या आसपास दाखल झाले असून, मुंबईकरांना दुपारी उन्हाचे चटके बसू लागले आहेत. राज्याचा विचार करता गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे होते. कोकण, गोव्या, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भाच्या तुरळक भागात किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले.
.................