Join us  

उष्णतेच्या झळांनी मुंबई पुन्हा तापली; ३६.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 11:25 AM

अवकाळी पावसाच्या तडाख्याने मुंबईसह महाराष्ट्र बेजार झाला असतानाच दुसरीकडे आता वाढते कमाल तापमान पुन्हा एकदा नागरिकांना घाम फोडू लागले आहे.

मुंबई : अवकाळी पावसाच्या तडाख्याने मुंबईसह महाराष्ट्र बेजार झाला असतानाच दुसरीकडे आता वाढते कमाल तापमान पुन्हा एकदा नागरिकांना घाम फोडू लागले आहे.  मुंबईत गुरुवारी ३६.९ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद झाली. मुंबईसह राज्यभरातील कमाल तापमानात कमालीची वाढ झाली असून, पुढील दोन दिवस राज्यातील काही भागांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

'काल त्यांनी सर्व अर्धवट सांगितलं...'; ठाकरे गटाच्या अनिल परब यांनी आज वाचूनच दाखवलं!

२ दिवस उष्णता

१० मेपासून असलेले ढगाळ वातावरण व  दिवसाच्या कमाल तापमानात साधारण २ ते ३ डिग्रीने झालेल्या वाढीने आर्द्रतायुक्त व गरम, अशा हवेमुळे रविवारपर्यंत मुंबईसह संपूर्ण कोकणात उष्णतेमुळे अस्वस्थता जाणवेल. महाराष्ट्रात सध्या सरासरीइतके किंवा त्याखाली जाणवत असलेले दिवसाचे कमाल तापमान पुढील ३ दिवस २ ते ३ डिग्रीने वाढण्याची शक्यता आहे.- माणिकराव खुळे, निवृत्त हवामान अधिकारी

मुंबईकरांना चटके 

मुंबईचे कमाल तापमान ३३ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत असले तरी वाढता उकाडा मुंबईकरांना घाम फोडत आहे. गुरुवारी पडलेल्या तापदायक उन्हाने तर मुंबईकरांना चटके दिले असतानाच हवामानातील बदलासह  उकाड्यामुळे निघणारा घाम मनस्तापात भर घालत आहे. राज्यात तापमानवाढीची स्थिती आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि कोकणच्या काही भागांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शुक्रवारी नाशिक, जळगाव, धुळे या जिल्ह्यांत कमाल तापमान अधिक राहील.- मुंबई, प्रादेशिक हवामानशास्त्र विभाग 

टॅग्स :उष्माघात