मोठी बातमी! मुंबईत आता दुचाकीस्वारासह पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट बंधनकारक, अन्यथा कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 12:24 PM2022-05-25T12:24:29+5:302022-05-25T12:34:01+5:30
मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेनं आता विना हेल्मेट दुचाकीस्वारांविरोधात कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई-
मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेनं आता विना हेल्मेट दुचाकीस्वारांविरोधात कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत विनाहेल्मेट दुचाकी चालवण्याचं प्रमाण वाढल्यामुळे आता दुचाकी चालकासह पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट बंधनकारक करण्याचा निर्णय मुंबई वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. दुचाकीस्वार आणि त्याच्या पाठीमागे बसलेल्या व्यक्तीनं हेल्मेट परिधान केलेलं नसेल तर कारवाई केली जाईल अशी माहिती देणारं पत्रकच मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेनं काढलं आहे.
"मुंबई शहरामध्ये अनेक मोटार सायकलस्वार हे विनाहेल्मेट मोटारसायकल चालवतात. तसेच मोटार सायकल चालविणाऱ्याच्या मागे बसलेली व्यक्ती देखील हेल्मेट परिधान करत नाही. वास्तविक पाहता मोटार सायकल चालवणारी आणि त्याच्या पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीनंही हेल्मेट परिधान करणं हे वाहन कायदा १९८८ कलम १२६ सह १९४ (ड) अन्वये बंधनकारक आहे. विनाहेल्मेट मोटारसायकल चालविल्यास वाहन कायद्यामध्ये ५०० रुपये दंडाची तरतूद आहे. तसेच तीन महिन्यांसाठी लायसन्स निलंबीत करण्याची तरतूद आहे", असं मुंबई पोलिसांनी काढलेल्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.
१५ दिवसांनंतर कारवाईला होणार सुरुवात
मुंबई वाहतूक पोलिसांच्या या परिपत्रकानुसार आता मुंबईत मोटारसायकल चालकासह पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. तशीच या नियमाची अंमलबजावणी तात्काळ सुरू करण्यास सांगितलं आहे. तर याविरोधातील कारवाई १५ दिवसांनी सुरू करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे.
मोटार सायकलस्वार आणि त्याच्या पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीने हेल्मेट वापरावे अन्यथा १५ दिवसानंतर अशा मोटारसायकलस्वार आणि त्याच्या पाठीमागे बसलेल्या व्यक्तींवरही कारवाई सुरू करण्यात येईल, असं पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.