Join us

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना अंतिम निकाल देताना कोणती गुणपद्धती अवलंबणार?- उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 5:26 AM

आयएससीईकडून मागितले स्पष्टीकरण

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्षात परीक्षेला बसू न शकणाऱ्या  दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कोणत्या प्रकारची गुणपद्धती अवलंबणार, असा सवाल करीत उच्च न्यायालयाने याबाबत आयएससीईला स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले.मंडळाने निश्चित केल्याप्रमाणे जुलै महिन्यात परीक्षेचे उर्वरित पेपर द्यायचे की अंतर्गत मूल्यमापन किंवा पूर्व-परीक्षेचे गुण स्वीकारायचे, या दोन पर्यायांपैकी एक पर्याय निवडण्यासाठी विद्यार्थ्यांना २२ जूनपर्यंत दिलेल्या मुदतीत वाढ करावी, अशी सूचना उच्च न्यायालयाने मंडळाला केली. याचिकाकर्ते अरविंद तिवारी यांनी मंडळाने घेतलेल्या निर्णयात विद्यार्थ्यांना कशा प्रकारे गुण देण्यात येणार, याबाबत स्पष्टता नसल्याचे बुधवारी न्यायालयाला सांगितले. मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. एस. एस. शिंदे यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी होती.मंडळाने दिलेल्या दोन पर्यायांबाबत विद्यार्थी आणि पालक संभ्रमात आहेत. विद्यार्थ्यांनी काही विषयांचे पेपर दिले आहेत. मात्र, कोरोनामुळे काही विषयांचे पेपर झाले नाहीत. त्यामुळे गुण देताना ज्या विषयांचे पेपर दिले आहेत ते गुण व अंतर्गत मूल्यमापन किंवा पूर्व परीक्षेचे गुण एकत्रित देणार की ज्या विषयांचे पेपर झाले आहेत, ते विषय सोडून ज्या विषयांचे पेपर राहिले आहेत, त्या विषयांचे पूर्व परीक्षेचे गुण अंतिम निकाल देताना गृहीत धरण्यात येणार, याबाबत पालक व विद्यार्थ्यांना संभ्रम आहे, अशी माहिती तिवारी यांनी न्यायालयाला दिली. दरम्यान, महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायलयाला सांगितले की, महामारीच्या काळात राज्याबाहेरील शैक्षणिक मंडळांवर सरकार नियंत्रण ठेवू शकते. त्यामुळे आयएससीई नव्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊ शकते की नाही, यावर सरकार निर्णय घेईल. घेण्यात येणाºया या परीक्षेसाठी किती विद्यार्थी परीक्षेला बसू इच्छितात, याची माहिती आयएससीई देईल, तेव्हा निर्णय घेऊ, असेही त्यांनी नमूद केले. विद्यार्थी व पालकांत मूल्यांकन नेमके कशा पद्धतीने होणार, याबाबत संभ्रम निर्माण झाल्याने उच्च न्यायालयाने आयएससीईला ही बाब स्पष्ट करण्याचे निर्देश दिले.

टॅग्स :मुंबई हायकोर्ट