“अक्षय शिंदेच्या बेड्या का काढल्या, फॉरेन्सिक रिपोर्टचे काय?”; हायकोर्टाचे प्रश्नांवर प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 05:56 PM2024-10-03T17:56:52+5:302024-10-03T17:58:47+5:30

Akshay Shinde Encounter Case: या याचिकेवरील पुढील सुनावणी कधी होणार?

mumbai high court asked many questions in akshay shinde encounter case | “अक्षय शिंदेच्या बेड्या का काढल्या, फॉरेन्सिक रिपोर्टचे काय?”; हायकोर्टाचे प्रश्नांवर प्रश्न

“अक्षय शिंदेच्या बेड्या का काढल्या, फॉरेन्सिक रिपोर्टचे काय?”; हायकोर्टाचे प्रश्नांवर प्रश्न

Akshay Shinde Encounter Case: राज्याला हादरवून टाकणाऱ्या बदलापूरमधील खासगी शाळेतील लहान मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा अचानक पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी अक्षय शिंदेचा दफनविधी करण्यात आला. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून, या याचिकेवरील सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा प्रश्नांवर प्रश्न विचारल्याची माहिती मिळाली आहे. 

अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायाधीशांनी अक्षय शिंदेचा फॉरेन्सिक रिपोर्ट आहे का? ती गोळी नेमकी कुठे गेली? आरोपीला पाणी पिण्यासाठी त्याची बेडी काढली का? मग त्याने पाणी पिण्यासाठी काय वापरले होते? चार गोळ्या झाडल्या ना? मग चार बुलेट शेल आहेत का? आणि दोन बंदुकीतून जर ४ गोळ्या झाडल्या तर मग २ वेगळे बुलेट शेल आहेत का? असे एकामागून एक प्रश्न विचारले.

या याचिकेवरील पुढील सुनावणी कधी होणार?

या प्रकरणी बंदुकीच्या फिंगर प्रिंटच्या संदर्भात माहिती द्या, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तसेच अक्षय शिंदे याला बेड्या होत्या. पण त्याला तहान लागली. त्यामुळे पाणी पिण्यासाठी पोलिसांनी त्याच्या हातातल्या बेड्या काढल्या होत्या. पण त्यावेळी अक्षय शिंदे याने पोलिसांच्या कंबरेला असलेली बंदूक काढून गोळीबार केला. ती गोळी गाडीच्या टपाला लागून बाहेर गेली. तसेच त्याला पाणी पिण्यासाठी जी पाण्याची बाटली दिली होती, ती सापडली आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. या याचिकेवरील पुढील सुनावणी १८ नोव्हेंबरला होणार असल्याचे समजते.

दरम्यान, बदलापूर प्रकरणात सहआरोपी करून गुन्हा दाखल करण्यात आलेले त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या प्रकरणात गुन्हा घडल्यापासून सातत्याने पोलिसांना हुलकावणी देत असलेले संस्थेचे चेअरमन उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना पोलिसांनी अटक केली. यानंतर लगेचच एका दिवसांत दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले. आधी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आता या दोघांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे.
 

Web Title: mumbai high court asked many questions in akshay shinde encounter case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.