Bombay High Court: महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात सरकारी नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी आरोपी दोन वर्षांहून अधिक काळ कारागृहात होता. याशिवाय आरोपींवर असेच चार गुन्हे दाखल आहेत. न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या खंडपीठाने आरोपीला जामीन मंजूर केला. प्रथमदर्शनी दोघांमधील संबंध संमतीने होते आणि अर्जदाराने तुरुंगवासाचा बराच कालावधी भोगला असल्याने, अर्जदाराला जामीन मिळण्याचा हक्क आहे, असं न्यायमूर्ती अनिल किलोर म्हणाले.
पीडित महिला विवाहित असून, फेसबुकच्या माध्यमातून तिची आरोपीशी सोशल मीडियावर ओळख झाली. आरोपी संतोष दत्ताराय पवार याने तिला पीडब्ल्यूडीमध्ये नोकरी देण्याचे आश्वासन देऊन तिच्याकडे पैसे मागितले होते. फिर्यादीनुसार, महिलेकडून आरोपीने नोकरीसाठी अंदाजे ८.६४ लाख रुपये उकळले. मात्र नोकरी न मिळाल्याने महिलेने पैसे परत मागायला सुरुवात केली. त्यानंतर आरोपीने फिर्यादीला ब्लॅकमेल करून लग्नाचे आश्वासन देऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.
तक्रारीनुसार, आरोपी स्वतः विवाहित असल्याचे म्हटलं जात आहे. आरोपीने शारिरीक संबंधादरम्यान व्हिडिओ बनवले आणि व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडितेकडून सोन्याचे दागिने बळकावले. पोलिसांतर्फे अतिरिक्त सरकारी वकील एस.एम. माणगावकर आणि फिर्यादी पक्षातर्फे वकील विनीत जैन यांनी जामीन अर्जाला विरोध केला. आरोपीवर चार गुन्हे दाखल आहेत, ज्यात पीडित महिलांचा समावेश आहे. आरोपीने चारवेळा असेच गुन्हे केल्याचे लक्षात घेऊन सत्र न्यायालयाने आरोपीचा जामीन फेटाळला होता, असं वकिलांनी सांगितले.
आरोपीची बाजू मांडणारे वकील यश नाईक यांनी आरोपपत्राकडे लक्ष वेधले आणि सांगितले की, प्रथमदर्शनी आरोपी आणि पीडित यांच्यात सहमतीचे संबंध होते. आरोपींविरुद्ध दाखल झालेल्या चार गुन्ह्यांपैकी दोन गुन्ह्यांमध्ये त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. एक गुन्ह्यात पुराव्याअभावी आणि दुसऱ्या गुन्ह्यात संमतीने लैंगिक संबंध ठेवण्यात आल्याने दोघांमध्ये निर्दोष मुक्तता केली होती. त्यानंतर सर्व युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर मुंबई हायकोर्टाने आरोपीला जामीन मंजूर केला.