Join us

Kirit Somaiya Vs Hasan Mushrif: “किरीट सोमय्यांची न्यायालयीन चौकशी करा”; हायकोर्टाचे निर्देश, पण नेमके प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 4:44 PM

Kirit Somaiya Vs Hasan Mushrif: कोणताही थेट संबंध नसताना किरीट सोमय्यांना आदेशांची तसेच FIRची कॉपी सर्वात आधी कशी उपलब्ध होते, असा थेट सवाल हायकोर्टाने केला आहे.

Kirit Somaiya Vs Hasan Mushrif: गेल्या काही दिवसांपासून सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांचे मुंबई, महाराष्ट्रासह देशभरात छापा सत्र सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. राजकीय नेते मंडळींवर छापा पडण्याचे प्रमाण वाढत चालले असून, यावरून विरोधक केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका करताना दिसत आहेत. यातच आता मुंबई उच्च न्यायालयात दाखल एका याचिकेवरील सुनावणीवेळी किरीट सोमय्या यांची न्यायालयीन चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

कोल्हापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मुश्रीफ यांच्या मालमत्तांवर ईडीने अलीकडेच छापेमारी केली होती. तसेच गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ईडीचा ससेमिरा पाठी लावण्यासाठी माझ्याविरोधाच ‘हेतुपुरस्सर’ गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केला होता. हा गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिकाही उच्च न्यायालयात दाखल केली होती. यावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने हसन मुश्रीफ यांना दिलासा दिला असून, किरीट सोमय्यांना तगडा झटका दिला आहे. 

कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे पोलिसांना आदेश

ईडी छापेमारीनंतर अडचणीत आलेल्या हसन मुश्रीफ यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. २४ एप्रिलपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे पोलिसांना मुंबई उच्च न्यायालाने आदेश दिले आहेत. हसन मुश्रीफांवर याप्रकरणी आरोप करणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्यांविरोधात न्यायालयीन चौकशीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या प्रकरणी पुणे सत्र न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीशांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 

किरीट सोमय्यांना कॉपी सर्वात आधी कशी उपलब्ध होते? 

हसन मुश्रीफ प्रकरणाशी कोणताही थेट संबंध नसताना किरीट सोमय्यांना न्यायालयांच्या आदेशांची तसेच एफआयआरची कॉपी सर्वात आधी कशी उपलब्ध होते? असा थेट सवाल उच्च न्यायालयाने यावेळी केल्याचे सांगितले जात आहे. तसेच राज्यात विरोधकांना जाणूनबुजून लक्ष्य केले जात असून भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी ही मोहीम हाती घेतली आहे, असा आरोप हसन मुश्रीफ यांनी या याचिकेद्वारे केला आहे. 

दरम्यान, ते तक्रार करतात आणि त्यानंतर ईडी कारवाई करते. हे केवळ राजकीय षड्यंत्र आहे. मागील सहा ते सात महिन्यांमध्ये घडलेल्या घटनांचा विचार करता आपल्याला ईडी प्रकरणांमध्ये अडकवण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न होत आहे. तसेच माझी राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करण्यासाठी हा सगळा घाट घातला जात असल्याचा दावा मुश्रीफ यांनी याचिकेद्वारे केला होता.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :हसन मुश्रीफकिरीट सोमय्यामुंबई हायकोर्ट