शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांना हायकोर्टाचा दिलासा; ईडी नोटिसीची अंमलबजावणी करणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 07:30 AM2024-10-11T07:30:53+5:302024-10-11T07:31:48+5:30
ईडीने शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांना जुहू येथील राहते घर आणि पुण्यातील फार्म हाऊस रिकामे करण्यासंदर्भात नोटीस बजावली.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: घराच्या जप्तीला आव्हान देणाऱ्या अपिलावर अपिलीय प्राधिकरण जोपर्यंत निर्णय घेत नाही, तोपर्यंत शिल्पा शेट्टी व राज कुंद्रा यांना घर रिकामे करण्यासंदर्भात बजावलेल्या नोटिसीची अंमलबजावणी करणार नाही, अशी हमी ईडीने उच्च न्यायालयाला गुरुवारी दिली.
ईडीने शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांना जुहू येथील राहते घर आणि पुण्यातील फार्म हाऊस रिकामे करण्यासंदर्भात २७ सप्टेंबरला नोटीस बजावली. त्या नोटिसीला उच्च न्यायालयात आव्हान दिले. ईडीने बजावलेली नोटीस मनमानी, बेकायदा आणि अनावश्यक आहे, असे याचिकेत म्हटले आहे. या दाम्पत्याला जप्तीच्या आदेशाविरोधात अपिलात जाण्याचा कायदेशीर मार्ग उपलब्ध असताना ईडीला घर रिक्त करण्याची नोटीस देण्याची काय घाई होती? असा सवाल न्या. रेवती मोहिते- डेरे व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने केला. त्यावर ईडीने न्यायालयाला संबंधित हमी दिली.
याचिकेनुसार, ईडीने २०१८ मध्ये अमित भारद्वाज आणि इतरांविरुद्ध बिटकॉइन फसवणूक आणि मनी लॉड्रिंगच्या आरोपाखाली तक्रार दाखल केली होती. शेट्टी आणि तिचा पती या दोघांचेही या प्रकरणात आरोपी म्हणून नाव नाही. ईडीने तपासादरम्यान कुंद्रा यांना अनेक वेळा चौकशीसाठी बोलावले होते.