लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानानजीक स्फोटके पेरणे आणि ठाण्याचे व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याचा जबाब विश्वासार्ह नाही, तपास यंत्रणेने सादर केलेल्या पुराव्यांवरून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख कदाचित दोषी ठरणार नाहीत, असे महत्त्वाचे निरीक्षण उच्च न्यायालयाने देशमुख यांची जामिनावर सुटका करताना नोंदविले.
सचिन वाझे याच्या जबाबावर ईडी अवलंबून आहे. फेब्रुवारी-मार्च २०२१ दरम्यान मुंबईतील बार व रेस्टॉरंट मालकांकडून वसूल केलेले १.७१ कोटी रुपये देशमुख यांचे स्वीय सहायक कुंदन शिंदे यांच्याकडे जमा केल्याचे सचिन वाझे याने जबाबात म्हटले आहे. मात्र, वाझे याचा जबाब खात्रीलायक नाही, अशी टिपणी न्या. निजामुद्दीन जमादार यांच्या एकलपीठाने केली.
वाझे हा सीबीआय व ईडीचा ‘माफीचा साक्षीदार’ झाल्याची दखलही न्यायालयाने घेतली. ‘आतापर्यंत वाझे हा सहआरोपी होता. फिर्यादी पक्षाने घेतलेला जबाब हा सहआरोपीचा जबाब आहे. या टप्प्यावर सहआरोपीचे विधान दुसऱ्याच्या विरोधात किती प्रमाणात वापरले जाऊ शकते, हा प्रश्न उपस्थित होतो, असेही न्यायालयाने म्हटले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"