कंगनाला मोठा दिलासा; कार्यालयावरील कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाकडून स्थगिती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 01:58 PM2020-09-09T13:58:46+5:302020-09-09T14:11:14+5:30
कंगनाच्या कार्यालयावरील कारवाई थांबवण्याचे आदेश
मुंबई: अभिनेत्री कंगना राणौतच्या कार्यालयात मुंबई महापालिकेकडून सुरू असलेल्या कारवाईला उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. या प्रकरणी कंगनानं दाखल केलेल्या याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे आदेश न्यायालयानं पालिकेला दिले आहेत. त्यामुळे कंगनाला काहीसा दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात होण्याच्या काही वेळापूर्वीच पालिकेनं कंगनाच्या कार्यालयावरील कारवाई थांबवली होती.
Bombay High Court stays BMC's demolition at Kangana Ranaut's property, asks the civic body to file reply on actor's petition pic.twitter.com/VaoeBSOnay
— ANI (@ANI) September 9, 2020
कंगनाच्या पाली हिल येथील कार्यालयालर पालिकेनं सकाळी कारवाई सुरू केली. अवैध बांधकाम प्रकरणी बजावण्यात आलेल्या नोटिशीला २४ तास उलटून गेल्यानं पालिकेकडून कारवाईला सुरुवात करण्यात आली. कंगनाच्या वकिलांकडून कारवाईला आक्षेप घेण्यात आला. पालिकेची कारवाई चुकीची असल्याचं म्हणत त्यांनी याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. यानंतर झालेल्या सुनावणीत कारवाईला स्थगिती देण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. कंगणा राणौतसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.
शिवसेना नेतृत्त्वाकडून पक्ष प्रवक्त्यांना आदेश
कंगना थोड्याच वेळात मुंबईत दाखल होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मातोश्रीवरून पक्ष प्रवक्त्यांना महत्त्वाचे आदेश देण्यात आले आहेत. कंगना आणि तिच्या कार्यालयावर झालेल्या कारवाईवर कुठेही बोलू नका, असे आदेश शिवसेना नेतृत्त्वाकडून पक्ष प्रवक्त्यांना देण्यात आले आहेत. 'कंगनाला जास्त महत्त्व देऊ नका. तिच्या कार्यालयावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. कंगनाच्या ट्विटवर, विधानांवर प्रतिक्रिया देऊ नका. त्यावर कोणतंही विधानं करू नका,' अशा सूचना मातोश्रीवरून देण्यात आल्या आहेत.
कार्यालयावर कारवाई सुरू होताच कंगना आक्रमक
कंगनानं एका ट्विटमध्ये आपल्या कार्यालयाला राम मंदिर म्हणत त्यावर कारवाई करणाऱ्यांची तुलना थेट बाबराशी केली. 'मणिकर्णिका फिल्ममध्ये पहिल्या चित्रपटाची घोषणा झाली, त्याचं नाव अयोध्या होतं. त्यामुळे ही माझ्यासाठी केवळ एक इमारत नाही, तर राम मंदिर आहे. आज तिथे बाबर आला आहे. आज इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. राम मंदिर पाडलं जातं आहे. पण बाबर, तू हे लक्षात ठेव, तिथेच पुन्हा राम मंदिर उभारलं जाईल. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम,' असं कंगनानं ट्विटमध्ये म्हटलं.
मणिकर्णिका फ़िल्म्ज़ में पहली फ़िल्म अयोध्या की घोषणा हुई, यह मेरे लिए एक इमारत नहीं राम मंदिर ही है, आज वहाँ बाबर आया है, आज इतिहास फिर खुद को दोहराएगा राम मंदिर फिर टूटेगा मगर याद रख बाबर यह मंदिर फिर बनेगा यह मंदिर फिर बनेगा, जय श्री राम , जय श्री राम , जय श्री राम 🙏 pic.twitter.com/KvY9T0Nkvi
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020
कंगनानं तिच्या कार्यालयावर सुरू असलेल्या कारवाईचे फोटो ट्विट करुन त्याला पाकिस्तान असं कॅप्शन दिलं आहे. तसंच लोकशाहीचा मृत्यू असंही म्हटलं आहे. बीएमसीचे अधिकारी आणि कर्मचारी कंगनाच्या घराबाहेर तैनात असलेला फोटो ट्विट करत बाबर आणि त्याचं सैन्य असं सांगत शिवसेनेला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.
Pakistan.... #deathofdemocracypic.twitter.com/4m2TyTcg95
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 9, 2020
कंगनाच्या कार्यालयात नेमकं काय अनधिकृत?
तळमजल्याजवळील शौचालयाच्या जागेत ऑफिससाठी केबिन, स्टोअर रूममध्ये अनधिकृतपणे स्वयंपाकघर, जेवणासाठी अनधिकृतपणे जागा तयार, जिन्याजवळ आणि तळमजल्याजवळच्या पार्किंग लॉटमध्ये दोन अनधिकृत शौचालये बांधली, पहिल्या मजल्यावर अनधिकृतपणे केबिन, देवघरातच बैठकीसाठी रूम, स्लॅब टाकून अनधिकृत शौचालय, पहिला मजला अनधिकृतपणे वाढवला, दुसर्या मजल्यावरील जिन्याच्या रचनेत बदल, बाल्कनीत फेरफार, स्लॅब टाकून मजल्याचा उभा विस्तार, शौचालय तोडून त्या जागेचा इतर गोष्टींसाठी वापर, बाजूच्या बंगल्यातील एक बेडरूम पार्टिशन तोडून स्वत:च्या बंगल्यात सामावून घेतला, बंगल्याच्या मुख्य गेटची दिशा बदलली.
कंगनाला मुंबई महानगरपालिकेचा दणका; कार्यालयातील अनधिकृत बांधकाम तोडण्याच्या कारवाईस सुरुवात
महापालिकेने बजावली होती नोटीस
कंगनाच्या कार्यालयाबाहेर मंगळवारी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी नोटीस लावली. कार्यालयात अवैध बांधकाम करण्यात आलं असून रहिवासी भागाचा कार्यालयीन वापर करण्यात आल्याचं नोटिशीत नमूद करण्यात आलं होतं. अधिनियम ३५४ अ अंतर्गत नोटीस लावण्यात आली होती. या नोटिशीची मुदत २४ तास होती. कंगनानं कार्यालयात बांधकाम करताना मुंबई महापालिकेच्या अधिनियम ३५४ अ चं उल्लंघन केल्याचं पालिका अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. पालिकेच्या नोटिशीत सात मुद्दे नमूद करण्यात आले आहेत. इमारतीचं बांधकाम पालिकेच्या नियमानुसार झालेलं नाही. दुसऱ्या मजल्यावरील स्लॅबचं बांधकाम अनधिकृतपणे करण्यात आलं आहे. नकाशात बेडरुमसोबत शौचालयं दाखवण्यात आलं होतं. कागदपत्रांत शौचालयं दाखवण्यात आलेली जागा प्रत्यक्षात मात्र ये-जा करण्यासाठी वापरण्यात आली आहे, असं पालिकेनं नोटिशीत म्हटलं आहे.
“बात 'हरामखोरीची' निघाली तर 106 हुतात्म्यांना गोळ्या घालणाऱ्या काँग्रेससोबतच सत्तेत बसलात ना?”
ना डरुंगी...ना झुकूंगी
राणी लक्ष्मीबाईचं धाडस, शौर्य आणि बलिदान मी सिनेमाच्या माध्यमातून जगले आहे. हे लोक मला माझ्या महाराष्ट्रात येण्यापासून रोखत आहेत याचं दु:ख आहे. मी राणी लक्ष्मीबाईच्या मार्गावर चालत आहे. मी कोणालाही घाबरणार नाही आणि झुकणारही नाही. चुकीच्या गोष्टींविरोधात सतत आवाज उचलत राहणार आहे, जय महाराष्ट्र, जय शिवाजी असंही कंगनानं ट्विटमधून शिवसेनेचं नाव न घेता बजावलं आहे.
शिवरायांच्या जन्मभूमीत स्त्री सन्मान अन् अस्मितेसाठी स्वत:चं रक्तही द्यायला तयार; कंगना राणौत भडकली
कंगना-शिवसेना वादाची सुरुवात कशी झाली?
कंगना राणौत आणि शिवसेना यांच्या संघर्षाची सुरुवात कंगनाच्या विधानानं झाली. ज्यात तिने शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर आरोप करत त्यांनी मुंबईत येऊ नये असं धमकावल्याचं सांगितले. याबाबत कंगनानं ट्विट करुन म्हटलं होतं की, संजय राऊत यांनी मला उघडपणे मुंबईत न येण्याची धमकी दिली आहे. मुंबईच्या गल्लोगल्ली स्वातंत्र्याचे नारे लावले जात होते आणि आता उघडपणे धमकी मिळत आहे. मुंबई पाकिस्तान व्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय? असं तिने म्हटलं होतं.
मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने अनेक कलाकारांपासून नेटिझन्सने कंगनाच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला. यादरम्यान कंगनानं शुक्रवारी ट्विट केले, त्यात लिहिलं की, मी बघत आहे, अनेक लोक मला मुंबईत येण्यापासून धमकी देत आहेत. त्यामुळे मी ९ सप्टेंबरला मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आहे. मी कोणत्या वेळी येणार हे मी पोस्ट करेन, कोणाच्या बापात हिंमत असेल तर मला अडवून दाखवा असं तिने थेट आव्हान दिले होते. त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी कंगना राणौतच्या पोस्टर्सला जोडेमारो आंदोलन केले होते.