हैदराबादमध्ये उपचारास वरवरा रावांना परवानगी; उच्च न्यायालयाचा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 05:46 AM2023-10-24T05:46:30+5:302023-10-24T05:48:33+5:30

डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी तेलंगणामध्ये जाण्याची परवानगी मिळावी, यासाठी राव यांनी जूनमध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

mumbai high court varavara rao allowed for treatment in hyderabad | हैदराबादमध्ये उपचारास वरवरा रावांना परवानगी; उच्च न्यायालयाचा दिलासा

हैदराबादमध्ये उपचारास वरवरा रावांना परवानगी; उच्च न्यायालयाचा दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी आरोपी असलेले डॉ. के. वरवरा राव यांना मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यासाठी एक आठवडा हैदराबादला जाण्याची उच्च न्यायालयाने सोमवारी परवानगी दिली.

एका डोळ्याची शस्त्रक्रिया झाल्यावर राव यांनी मुंबईला परत यावे आणि दुसऱ्या डोळ्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी विशेष न्यायालयाची परवानगी घ्यावी, असे न्या. अजय गडकरी यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सांगितले. राव यांना २०१८ मध्ये अटक करण्यात आली. २०२१ मध्ये त्यांना सहा महिन्यांसाठी तात्पुरता जामीन मंजूर करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट २०२२ मध्ये त्यांना सशर्त वैद्यकीय जामीन मंजूर केला. न्यायालयाच्या परवानगीशिवाय त्यांनी एनआयए, मुंबईची हद्द सोडून जाऊ नये, अशी अट घातली.

जूनमध्ये दाखल  केली होती याचिका     

डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी तेलंगणामध्ये जाण्याची परवानगी मिळावी, यासाठी राव यांनी जूनमध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मोतीबिंदूमुळे आपली दृष्टी कमी झाली आहे, असे राव यांनी याचिकेत म्हटले आहे. मुंबईत डोळ्यांवर शस्त्रक्रिया करणे आणि शस्त्रक्रियेनंतर घेण्यात येणारी काळजी खर्चिक आहे. पेन्शन मिळत असल्याने तेलंगणामध्ये ही शस्त्रक्रिया मोफत करण्यात येईल, असे राव यांनी याचिकेत म्हटले आहे. एनआयएने त्यांच्या याचिकेला विरोध केला. राव हैदराबादचे असल्याने व तेथेच त्यांची संघटना असल्याने समस्या निर्माण होऊ शकते, अशी भीती एनआयएने व्यक्त केली. एल्गार परिषदेच्या आयोजनामागे राव यांचा हात होता, असा आरोप पोलिसांनी केला आहे.


 

Web Title: mumbai high court varavara rao allowed for treatment in hyderabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.