१२ हजार ९८२ बालकांना न्यूमोनिया, राज्यात सर्वाधिक संख्या मुंबईत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 05:34 AM2019-12-25T05:34:06+5:302019-12-25T05:34:35+5:30
राज्यात सर्वाधिक संख्या मुंबईत : सार्वजनिक आरोग्य विभागाची माहिती
स्नेहा मोरे
मुंबई : राज्यात या वर्षी एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत शून्य ते पाच वयोगटातील १२ हजार ९८२ नवजात बालकांना न्यूमोनियाच्या आजाराचे निदान झाल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली. यात मुंबईत सर्वाधिक ४ हजार ३९५ बालकांना न्यूमोनिया झाला आहे, मात्र यात काही स्थलांतरित रुग्णांचाही समावेश आहे. तर मुंबईनंतर पुण्यात १ हजार १४० आणि ठाण्यात १ हजार १२ रुग्णांची नोंद झाली आहे.
गेल्या वर्षी राज्यातील न्यूमोनियाचा संसर्ग झालेल्या नवजात बालकांची संख्या १३ हजार ९२३ इतकी होती, तर मुंबईत ही संख्या ४ हजार ६८ होती. औरंगाबादमध्ये मागील दोन वर्षांत एकाही रुग्णाची नोंद झालेली नाही. शासकीय वा खासगी रुग्णालयात होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी न्यूमोनियामुळे २१ टक्के मृत्यू होतात. वेळीच उपचार व योग्य काळजी घेतल्याने हा आजार नियंत्रणात आणणे शक्य असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.
देशात दर हजार लोकसंख्येमागे खूप लहान किंवा वृद्ध मंडळींमध्ये ५ ते ११ जणांमध्ये हा आजार आढळून येतो. गर्भधारणेदरम्यान पहिल्या दोन महिन्यांत बाळाचे हृदय तयार होते. या वेळी गर्भवती महिलेला संसर्ग झाल्यास बाळालाही समस्या उद््भवू शकते. याशिवाय सध्याच्या वातावरणातील प्रदूषणही हृदयावर विपरीत परिणाम करते. यामुळे गर्भवती महिलांनी स्वच्छ वातावरणात राहणे गरजेचे आहे. बाळाला जन्मजात हृदयाचा आजार आहे याचे निदान लगेच होऊ शकत असले, तरी तो आजार होण्यामागील निश्चित कारणे समजणे तसे अवघड असते. याबाबत काही घटक जोखमीचे मानले जातात.
याविषयी बालरोगतज्ज्ञ डॉ. अमित सागरे यांनी सांगितले की, पाच वर्षांच्या आतील बालकांमध्ये न्यूमोनियापासून संरक्षण मिळवण्यासाठी लसीकरण हा सर्वांत चांगला उपाय आहे. ‘न्यूमोकोक्कल’ लस तसंच ‘एचआयबी’ लस (हिमोफिलिस इन्फ्लूएन्झा) लस जीवाणूजन्य न्यूमोनियाचा प्रतिबंध करते, तर विशिष्ट प्रकारच्या विषाणूजन्य न्यूमोनियावर ‘एच १ एन १’ लस घेण्याचा फायदा होतो. न्यूमोकोक्कल व एचआयबी
लसी मोठ्या माणसांना - विशेषत: ६५ वर्षांवरील किंवा इतर
आजार असलेल्या व्यक्तींनाही जरूर द्याव्यात.
न्यूमोनियाचे दुष्परिणाम
च्अशक्तपणा येणे
च्फुप्फुसांमध्ये पाणी किंवा पू भरणे
च्श्वासोच्छ्वास घेताना त्रास होणे,
तो अपुरा पडणे
च्संपूर्ण शरीरात संसर्ग होणे
च्मेंदूत पू होणे
च् हृदयाला संसर्ग होणे
लस उपलब्ध
काही जीवाणू वा विषाणूजन्य न्यूमोनिया टाळण्यासाठी लस उपलब्ध आहे. गरोदर स्त्रिया, ६५ वर्षांहून जास्त वयोगटातील व्यक्ती किंवा प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींना त्याचा फायदा होऊ शकतो.
२०१९ २०१८
जिल्हा रुग्णसंख्या रुग्णसंख्या
मुंबई ४,०६८ ४,३९५
पुणे १,१४० १,३८२
ठाणे १,०१२ १,२८१
राज्य १२,९८२ १३,९२३
लक्षणे कोणती?
खोकला, थकवा, ताप, श्वास घेण्यास त्रास होणे, फीट्स येणे, छातीत दुखणे अशी लक्षणे न्यूमोनियात दिसतात. काही रुग्णांमध्ये खोकल्याबरोबरच रक्तदाब कमी होणे किंवा वृद्धांमध्ये बेशुद्धी हेही लक्षण असू शकते.