Join us

मे महिन्यात मुंबईत घर विक्रीत ५० टक्‍क्‍यांनी घट; कोरोनाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2021 4:06 AM

मुंबई : २०२१ च्या एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात मुंबईतील घर खरेदी ५० टक्क्यांनी घटली आहे. यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या ...

मुंबई : २०२१ च्या एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात मुंबईतील घर खरेदी ५० टक्क्यांनी घटली आहे. यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा बांधकाम क्षेत्राला मोठा फटका बसल्याचे दिसून येत आहे.

मे महिन्यात अक्षय तृतीयेसारखा मोठा मुहूर्त असल्याने बांधकाम व्यावसायिकांना या महिन्यात जास्त घरे खरेदीची अपेक्षा होती. मात्र कोरोनाचा प्रकोप अद्यापही कायम असल्याने यंदाच्या मे महिन्यात ग्राहकांनी घर खरेदीकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.

एप्रिल महिन्यात मुंबईत १० हजार १३५ घरांच्या खरेदीची नोंद झाली होती. मात्र मे महिन्यात ५ हजार ३६० घरांची खरेदी नोंदविली गेली. थेट ५० टक्क्यांनी घर खरेदी घटल्याने बांधकाम क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये बांधकाम क्षेत्राला मोठा फटका बसला. घर खरेदीला पुन्हा चालना मिळावी यासाठी राज्य शासनाच्यावतीने मुद्रांक शुल्कात तीन टक्‍क्‍यांनी सवलत देण्यात आली होती. या सवलतीचा फायदा घेत ऑक्टोबर २०२० ते मार्च २०२१ दरम्यान मोठ्या प्रमाणात घर खरेदी नोंदविली गेली.

विशेषतः डिसेंबर महिन्यापासून घर खरेदीला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. मुद्रांक शुल्क सवलतीचा मार्च हा शेवटचा महिना होता, तरी देखील एप्रिल महिन्यात देखील घर खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला. कारण मार्च महिन्यात मुद्रांक शुल्क भरून नागरिकांनी एप्रिल महिन्यात घरखरेदी केली होती. मात्र मे महिन्यात विक्री थेट ५० टक्‍क्‍यांनी घटली.

बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ दीपक गोराडिया यांच्या म्हणण्यानुसार सरकारने मुद्रांक शुल्क सवलत बंद केल्याने आता घरी खरेदीदारांना पाच टक्के मुद्रांक शुल्क भरावे लागत आहे. यामुळे घरांच्या किमती काही प्रमाणात महागल्या आहेत. त्याचप्रमाणे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेक व्यवसाय ठप्प असून नागरिकांच्या नोकरी-धंद्यावर देखील परिणाम झाला आहे. आर्थिक अडचण असल्यामुळे ग्राहक गुंतवणूक करण्यासाठी पुढे येत नाहीत. मार्च महिन्यानंतर सरकारने मुद्रांक शुल्क सवलत कायम ठेवणे गरजेचे होते. मात्र तसे न केल्याने घर खरेदीत घट झाली आहे. यामुळे सरकारने मुद्रांक शुल्कात सवलत द्यायला हवी.