मीरारोड - मीरारोड मध्ये सदनिका बळकावण्यासाठी बळजबरी घुसखोरी करून घरात रहात असलेल्यांना बाहेर हुसकावून लावण्यासह धमकी व तोडफोड करण्याचे एकाच दिवशी दोन प्रकार घडले आहेत. या दोन्ही ओरकरणात मीरारोड पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. पहिल्या घटनेत मीरारोडच्या साईबाबा नगर मधील नर्मदा टॉवर मध्ये असलेल्या एका सदनिकेच्या मालकी हक्काचा वाद ठाणे न्यायालयात सुरु असताना तृतीयपंथी आणि महिलां मार्फत घरात राहणाऱ्यांना बाहेर काढून त्यांच्या सामानाची तोडफोड केल्या प्रकरणी मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओसामा शेख (२२) यांच्या ३० डिसेंबर रोजीच्या फिर्यादी नुसार , दुपारी शबाना शेख हिच्या सांगण्यावरून संगनमताने २ तृतीयपंथी आणि १५ महिलांचा जमाव बळजबरी घरात घुसला आणि त्याला व त्याचा ११ वर्षाचा लहान भाऊ यासिर यांना घरातून हुसकावून लावले. ओसामाचा मोबाईल काढून घेतला व सीसीटीव्हीची मोडतोड केली. घरातील सामानाची नासधूस केली. पोलिसांनी शबानासह २ तृतीयपंथी व १५ महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. या आधी देखील शबानावर बळजबरी घरात घुसल्या प्रकरणी ऑक्टोबर महिन्यात गुन्हा दाखल केला होता.
दुसरी घटना मीरारोडच्या बेव्हर्ली पार्क भागातील गौरव वुड्स फेज २ मध्ये घडली आहे. फिर्यादी आरती सुजाया (३५) ह्या सदर ठिकाणी काका शिवकुमार सिंग (६३), मामाची मुलगी आकांक्षा सिंग (२५) व शिवानी सिंग (३४) यांच्यासोबत राहतात. ऑगस्ट २०२० मध्ये सदर सदनिका त्यांनी ६३ लाख रुपयांना राजकुमार सिंग ह्यांच्याकडून नोंदणीकृत करारनामा करून खरेदी केली आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये राजकुमार यांनी सदनिकेचा ताबा आरती याना दिला तेव्हापासून त्या येथे राहतात. ३० डिसेंबर रोजी त्या खरेदीसाठी मुंबईला गेल्या असता दुपारी काकांनी कॉल करून सांगितले कि, एक इसम व ३ महिला घरात बळजबरी घुसून त्यांना घरातून हाकलून बाहेर काढले आहे.
आरती ह्या तडक मुंबई वरून निघाल्या व घरी पोहचल्या असता घराचा दरवाजा उघडा होता व आत मध्ये असलेल्या एक इसम आणि ३ महिलांना घरात घुसल्याबद्दल जाब विचारला. त्यावर स्वतःचे नाव प्रकाश कोटियन असे म्हणवणाऱ्या त्या इसमाने सदर सदनिका जयश्री मनचंदा कडून आपण डिसेबंर २०२० मध्ये विकत घेतली असून मालकी माझी असल्याने घरातून तुमचे सामान काढून निघून जा असे धमकावले. आरती यांनी सदर सदनिका आपण खरेदी केल्याचे सांगून घरातून निघा सांगितल्यावर प्रकाश व महिलांनी आरती यांना दमदाटी करुन बघुन घेण्याची धमकी दिली. आरती यांच्या फिर्यादी नुसार पोलिसांनी प्रकाश व महिलांवर गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.