Join us  

कोल्ड कॉफीमध्ये झुरळ सापडल्याचा आरोप! मुंबईतील मॅनेजर, वेटर, संबंधितांवर गुन्हा दाखल

By गौरी टेंबकर | Published: August 31, 2024 10:24 AM

हॉटेलच्या मालकाला ही बाब दाखवल्यावर तक्रारदार प्रतीक रावत यांच्याकडे म्हणण्याकडे दुर्लक्ष केल्याचाही आरोप

गौरी टेंबकर-कलगुटकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: आईस्क्रीम मध्ये मानवी बोट सापडल्याचा प्रकार ताजा असताना एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी चालवणाऱ्या प्रतीक रावत या (२५) तरुणाला त्यांनी ऑर्डर केलेल्या कोल्ड कॉफी मध्ये झुरळाचे अवशेष सापडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुख्य म्हणजे ही बाब त्याने सदर हॉटेलच्या मालकाला दाखवल्यावर त्यांनी त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यानुसार या विरोधात त्यांनी मालाड पोलिसात धाव घेतल्यावर हॉटेल मॅनेजर, वेटर आणि अन्य संबंधितांवर बीएनएस कायद्याचे कलम १२५,२७४,२७५ आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार रावत यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, ३० ऑगस्ट रोजी रात्री ९.३० च्या सुमारास ते त्यांचा मित्र गणेश केकान (२५) सह मालाड पश्चिम च्या इन्फिनिटी मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या 'होप अँड शाईन लाउंज'मध्ये गेले होते. त्या ठिकाणी ते टेबल क्रमांक ६ वर बसले आणि त्यांनी दोन कोल्ड कॉफी ऑर्डर केल्या. वेटरने कॉफी आणल्यानंतर पहिल्या सिपमध्ये कॉफी कडवट लागल्याने त्यांनी वेटरला बोलवत त्यामध्ये स्वीट टाकण्यास सांगितले. त्यानुसार वेटर दोघांचे ग्लास घेऊन बार काउंटरवर गेला आणि कॉफीमध्ये स्वीट टाकून परत त्यांना कॉफीचे ग्लास आणून दिले. प्रतीक ती कोल्ड कॉफी काचेच्या ग्लासमधून स्ट्रॉ ने पीत होते आणि थोडी कॉफी ग्लासमध्ये शिल्लक राहिल्यावर त्यांना त्यात काहीतरी असल्याचे जाणवले. त्यामुळे त्यांनी बारकाईने पाहणी केली असता त्यात त्यांना झुरळ दिसले. लगेचच ही बाब त्यांनी त्याच्या मित्राच्याही लक्षात आणून दिली आणि त्याचा फोटो काढला. 

जाळीतून झुरळ जाऊ शकत नाही!

प्रतीकच्या म्हणण्यानुसार, काही वेळाने हॉटेलचे ओनर त्यांच्याकडे आले आणि त्यांनी तो ग्लास उचलून प्रतीकना किचनमध्ये नेले. तिथे त्यांनी कोल्ड कॉफीच्या शेकमध्ये बनवली जाते त्या शेकची जाळी दाखवली. झुरळ जाऊ शकत नाही किंवा ग्लासमध्ये झुरळ कसे गेले असे म्हणत ग्लासमधील झुरळ काढून ते शेकरच्या जाळीवर ठेवत त्यावर पाण्याचा नळ चालू करून झुरळ यातून जाऊ शकत नाही हे त्यांना दाखवले. त्यानंतर त्या झुरळाला त्यांनी बेसिनमध्ये टाकत पाण्याचा नळ चालू करून पाण्यातून सोडून दिले. 

पोलीस, पालिकेला तक्रार...

मी या प्रकरणी मालाड पोलिसात तक्रार दिली असून या विरोधात पालिकेच्या पी उत्तर विभागाला देखील पत्र लिहिणार आहे. कॉफी बनवताना किंवा ती आणून देताना त्यात झुरळ पडले असल्यास त्यावर दुर्लक्ष केले गेले. ज्यामुळे झुरळाचे काही भाग त्यावरील जंतू हे माझ्या कॉफी द्वारे माझ्या किंवा इतरांच्या पोटात गेले असल्यास त्याने शरीराला अपाय निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी माझी मागणी आहे.-प्रतीक रावत, तक्रारदार

टॅग्स :मुंबई