लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच मुंबईकरांना उन्हाचे चटके बसू लागले आहेत. मुंबईचे कमाल तापमान बुधवारी ३७.३ अंश सेल्सिअस हाेते. चालू मौसमातील आतापर्यंतचा हा उच्चांक आहे. विशेषत: सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत पडणाऱ्या तापदायक उन्हामुळे मुंबईकरांच्या शरीरातून घामाच्या धारा वाहात आहेत. मुंबईसह राज्यातील शहरांच्या कमाल तापमानात वाढ झाली असून, हे कमाल तापमान ३७ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येत आहे.
राज्यभरात सर्वत्र कमाल तापमानात वाढ झाली असून, विदर्भात उष्णतेची लाट येईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. जळगाव, कोल्हापूर, मालेगाव, नाशिक, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, परभणी, अकोला, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वाशिम, वर्धा या शहरांचे कमाल तापमान ३६ ते ३७ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येत आहे.