मुंबई : मुंबईसह राज्याच्या वातावरणात उल्लेखनीय बदल होत असून, मुंबईच्या किमान तापमानात उत्तरोत्तर वाढ नोंदविण्यात येत आहे. किमान तापमान १८ हून २२ अंश सेल्सिअसवर पोहोचले असून, कमाल तापमानही ३२ अंशांवर आले आहे. विशेषत: दुपार मुंबईकरांना चटके देत असून, उत्तरोत्तर यात भरच पडणार आहे. मुंबई चांगलीच तापली असताना दुसरीकडे राज्याला गारांचा इशारा कायम असून, २४ फेब्रुवारी रोजी उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी राज्यात सर्वात कमी किमान तापमान जळगाव येथे १३.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. २३ फेब्रुवारी रोजी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी तर २४ फेब्रुवारी रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. २५ फेब्रुवारी रोजी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, तर २६ फेब्रुवारी रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे.मुंबईचा विचार करता शुक्रवारसह शनिवारी मुंबईचे आकाश निरभ्र राहणार असून कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३६, २२ अंशांच्या आसपास राहील, असाही अंदाज हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे.
मुंबई तापली; राज्याला गारांचा इशारा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 6:31 AM