Join us

वाह ताज ...! ‘अ रूम विथ अ व्ह्यू’मधून दुर्मीळ छायाचित्रांचे प्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 10:05 AM

हाॅटेलच्या रूममधून दिसणाऱ्या मुंबईचा कोपरा कॅमेऱ्यात कैद.

मुंबई : कुलाबा येथील ताजमहाल पॅलेस येथे कलाकार माॅर्टिमर चॅटर्जी यांनी क्युरेट केलेले ‘अ रूम विथ अ व्ह्यू’ हे दुर्मीळ छायाचित्रांचे प्रदर्शन कलारसिकांसाठी पर्वणी आहे. या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे ताजमहाल पॅलेसचे आणि या हाॅटेलमधील रूममधून दिसणाऱ्या मुंबईचा कोपरा कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. यात अजय डे, नयना कनोडिया, राम कुमार, मुरली लाहोटी, माधव सतवळकर आणि जहांगीर सबावाला यांच्या छायाचित्रांचा समावेश करण्यात आला आहे.

हाॅटेलमध्ये विविध कलांची जपणूक व्हावी आणि कलाकारांना व्यासपीठ मिळण्याच्या दृष्टीने मुंबई गॅलरी वीकेंडचा उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमांतर्गत हे प्रदर्शन आयोजित केले असून प्रत्येक वीकेंडला सकाळी १० ते सायंकाळी आठपर्यंत कलारसिकांसाठी खुले राहील. मुंबईची ओळख म्हणून कायमच गेट वे ऑफ इंडिया, ताज आणि शहर उपनगरातील काही पर्यटनस्थळांची छायाचित्रे जगभर प्रसिद्ध केली जातात. मात्र मुंबईची ही ओळख कशी बनली आणि काळानुरूप छायाचित्रांचा बदलता प्रवास, दृष्टिकोन या प्रदर्शनातून उलगडला आहे. कलाकारांच्या कलाकृती या ठिकाणी मांडण्यात आल्या आहेत. मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना सांस्कृतिक कलेचे वैभवही पाहता यावे या उद्देशाने या उपक्रमाची सुरुवात करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.  

सहा दशकांहून अधिक काळ ताजमहाल पॅलेसची आर्ट गॅलरी मुंबईच्या कलेचा केंद्रबिंदू राहिली आहे, या ठिकाणी सुमारे ४ हजार कलाकृती आहेत. या प्रदर्शनाच्या निमित्ताने कला रसिकांना या दुर्मीळ आणि वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती पाहता येतील.

टॅग्स :मुंबईहॉटेल