हाउसिंग स्टॉकची घरे मुंबईकरांना मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 03:30 AM2020-01-25T03:30:18+5:302020-01-25T03:30:37+5:30
म्हाडाच्या इमारती पुनर्विकास करताना अनेक विकासकांनी म्हाडाला हाउसिंग स्टॉक (गृहसाठा)ऐवजी प्रीमियम दिल्याने म्हाडाची तिजोरी जरी भरली असली तरी म्हाडाचा हाउसिंग स्टॉक मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.
मुंबई - म्हाडाच्या इमारती पुनर्विकास करताना अनेक विकासकांनी म्हाडाला हाउसिंग स्टॉक (गृहसाठा)ऐवजी प्रीमियम दिल्याने म्हाडाची तिजोरी जरी भरली असली तरी म्हाडाचा हाउसिंग स्टॉक मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. यामुळे घराच्या प्रतीक्षेत असलेल्या सामान्य मुंबईकरांना म्हाडा स्वस्तातले घर देऊ शकले नाही. आता मुंबईकरांना घर देण्याचा आपला उद्देश साध्य करण्यासाठी म्हाडा विकासकाकडून प्रीमियमऐवजी हाउसिंग स्टॉक घेण्यावर भर देणार आहे. यामुळे हाउसिंग स्टॉक वाढताच सामान्य मुंबईकरांना परवडणारी घरे उपलब्ध होणार आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून म्हाडा सामान्य मुंबईकरांना स्वप्नातले स्वस्त घर लॉटरीच्या माध्यमातून देत आहे. म्हाडाची मुंबईमध्ये सुमारे सात हजार एकरपेक्षा अधिक जागा आहे. यासह म्हाडाच्या ५६ वसाहती आहेत. या सर्वाचा विचार करता भविष्यामध्ये या जागेवरील वसाहतींचा पुनर्विकास करताना विकासकांकडून प्रीमियमऐवजी हाउसिंग स्टॉक घेतला तर म्हाडाला टप्प्याटप्प्यात हजारो घरांचा साठा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचे घराचे स्वप्नदेखील पूर्ण होईल.
म्हाडा वसाहतीतील पुनर्विकास करताना पूर्वी विकासकाकडून गृहसाठा घेतला जात होता. म्हाडाकडे अशा प्रकल्पांमधून टप्पाटप्प्याने घरे उपलब्ध होत होती़ यामुळेच म्हाडाकडे इतर बांधकाम प्रकल्पांबरोबरीने या घरांमुळे सोडतीच्या दृष्टीने पुरेसा साठा उपलब्ध होत होता. कालांतराने काही राजकीय पक्षांनी त्यास विरोध दर्शवत विकासकांची तळी उचलून धरली. म्हाडाने गृहसाठ्याऐवजी प्रीमियम रक्कम स्वीकृत करावी, यासाठी मोर्चाही काढण्यात आला होता. या घडामोडीनंतर म्हाडाने गृहसाठ्याऐवजी प्रीमियम स्वीकारण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून म्हाडाचा गृहसाठा कमी होत चालला आहे.
सध्या म्हाडाच्या विविध भूखंडांवरील अतिक्रमणे रोखण्यासोबतच सर्व ठिकाणी स्वत: म्हाडा विकासकाची भूमिका पार पाडणार आहे. म्हाडाच्या ५६ वसाहतींतील पुनर्विकासात प्रीमियमऐवजी गृहसाठा घेण्याबाबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नुकतेच मत मांडले. म्हाडामार्फत पुनर्विकास प्रकल्प राबवून गृहसाठा निर्माण करण्यात येणार आहे. यामुळे म्हाडासमोर निर्माण झालेली घरांची वानवा संपुष्टात येऊ शकते, असे मत व्यक्त केले जात आहे.