स्वप्नातले घर साकारताना मुंबईकरांनी मारली बाजी; १.५ लाख घरांची खरेदी-विक्री, दिल्लीला टाकले मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 09:43 AM2024-01-05T09:43:58+5:302024-01-05T09:47:04+5:30
मुंबईत स्वत:चे हक्काचे घर असावे, असे स्वप्न अनेकांचे असते.
मुंबई : मुंबईत स्वत:चे हक्काचे घर असावे, असे स्वप्न अनेकांचे असते. ही स्वप्नपूर्ती करून मुंबईकरांनी घर खरेदीत दिल्लीलाही मागे टाकले आहे. नुकत्याच सरलेल्या २०२३च्या वर्षात मुंबई व महामुंबई परिसरात एकूण १ लाख ५३ हजार ८७० घरांची विक्री झाली असून, विक्रीच्या या विक्रमी संख्येमुळे देशाच्या रिअल इस्टेट उद्योगात मुंबईने अव्वल क्रमांक गाठला आहे. या विक्रमामुळे देशाची राजधानी असलेल्या दिल्लीलादेखील मुंबईने लक्षणीय विक्री फरकाने मागे टाकले आहे. २०२३ या वर्षात दिल्लीमध्ये ६५ हजार ६२५ घरांची विक्री झाली आहे.
२०२२ मध्ये कोरोनाचे सावट संपल्यानंतर २०२३ च्या वर्षामध्ये मुंबईच्या रिअल इस्टेट बाजारात मोठ्या प्रमाणावर तेजी निर्माण झाली. २०२३ मधील एखाद्-दोन महिन्यांचा अपवाद वगळता बाकी सर्व महिन्यांत प्रति महिना १० हजारांपेक्षा जास्त घरांची विक्री झाली आहे. २०२२च्या तुलनेत २०२३ मध्ये मुंबई व महामुंबईत झालेली गृहविक्री ४० टक्क्यांनी अधिक ठरली आहे. २०२२ मध्ये मुंबई व महामुंबई परिसरामध्ये १ लाख ९ हजार ७३० घरांची विक्री झाली होती.
राज्य सरकारला मिळाला १० हजार ८८९ कोटींचा महसूल:
२०२३ चे वर्ष मुंबई व उपनगराकरिता आणखी एका कारणाने वैशिष्ट्यपूर्ण ठरले. कारण ज्या घरांच्या किमती एक कोटी रुपये किंवा त्यापेक्षा अधिक आहेत अशा घरांच्या विक्रीतील टक्केवारी ५७ टक्के इतकी ठरली आहे.
तर, ३ ते ५ कोटी रुपये किमतीच्या घरांच्या विक्रीचे प्रमाणही २२ टक्क्यांच्या आसपास आहे. १० कोटी ते १०० कोटी रुपयांच्या घरांच्या विक्रीचे प्रमाण ८ टक्क्यांच्या आसपास ठरले आहे. या विक्रमी विक्रीमुळे राज्य सरकारला सरत्या वर्षात एकूण १० हजार ८८९ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. गेल्या वर्षी झालेल्या मालमत्ता व्यवहारांमध्ये ८० टक्के प्रमाण हे निवासी मालमत्तांचे असून २० टक्क्यांमध्ये व्यावसायिक मालमत्तांचा समावेश आहे.
२०२३ मध्ये मुंबई व महामुंबई परिसरात नव्या प्रकल्पांची सुरुवात देखील दणक्यात झाली आहे. प्राप्त माहितीनुसार, या वर्षात १ लाख ५७ हजार ७०० नव्या घरांच्या निर्मितीचे प्रकल्प सुरू झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या २७ टक्के अधिक आहे. २०२२ मध्ये १ लाख २४ हजार ६५० घरांच्या उभारणीचे प्रकल्प सुरू झाले होते.
बॉलीवूड स्टार्सकडूनही ३७३ कोटींची खरेदी :
२०२३ मध्ये मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये बॉलीवूडमधील अनेक कलावंतांनी मिळून एकूण ३७३ कोटी रुपयांची खरेदी केली आहे. यामध्ये सर्वाधिक मोठा व्यवहार हा दीपिका व रणवीर या दाम्पत्याने केला असून त्यांनी ११९ कोटी रुपयांना घराची खरेदी केली आहे.
अमिताभ बच्चन, राजकुमार राव, आलिया भट, सोनाक्षी सिन्हा, प्रीती झिंटा, अजय देवगण, ह्रतिक रोशन, विराट व अनुष्का, कार्तिक आर्यन, काजोल, आलिया भट यांनी देखील कोट्यवधींच्या मालमत्तांची खरेदी केली आहे.