मुंबई: राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यात मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये दिवसाला किमान १० हजार रुग्ण वाढत आहेत. राज्य सरकारकडून कडक निर्बंध लादले असतानाही नागरिकांकडून मात्र सर्रास नियमांचं उल्लंघन केलं जात असल्याचा पाहायला मिळत आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुढीपाडवा अत्यंत साध्या पद्धतीनं घरच्या घरीच साजरा करुन आरोग्याची गुढी उभारण्याचं आवाहन केलं असतानाही मुंबईत दादर फुल मार्केटमध्ये सकाळी तोबा गर्दी उसळलेली पाहायला मिळाली. सोमवारीही अशीच गर्दी या परिसरात झाली होती. दादरच्या भाजी आणि फुल मार्केटमध्ये सर्व नियम धाब्यावर बसवून मोठ्या संख्येनं नागरिक बाजारात एकत्र जमा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. या गर्दीत सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडालेला पाहायला मिळाला.
मुंबई पोलीस आणि महापालिकेच्या वतीनंही गर्दी न करण्याचं आवाहन केलं जात असतानाही होत असलेली गर्दी पाहून नागरिकांमध्ये कोरोनाचं भयच उरलेलं नाही का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्यात लॉकडाऊन निश्चितराज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार १५ दिवसांचा कडक लॉकडाऊनच्या विचारात आहे. यासंबंधिचा अंतिम निर्णयापर्यंत सरकार पोहोचलं असून लवकरच लॉकडाऊन संदर्भातील घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. राज्यात १४ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून ते ३० एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत लॉकडाऊन करण्याचा विचार राज्य सरकारनं केल्याचं समजतं.