आपण समाजाचं देणं लागतो, याची प्रचिती ज्यांच्या प्रत्येक कृतीतून येते असे उद्योगपती रतन टाटा यांच्या एका पोस्टनं पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मुंबईत प्राण्यांच्या रुग्णालयात त्यांचा श्वान उपचारासाठी दाखल असून रक्तदात्याच्या शोधात रतन टाटा आहेत. त्यासाठी त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये त्यांनी श्वानाचा जीव वाचवण्यासाठी आवश्यक असलेली माहिती दिली आहे आणि मुंबईकरांना मदतीचं आवाहन केलं आहे.
रतन टाटा संचालक असलेल्या प्राण्यांच्या रुग्णालयात एका ७ महिन्यांच्या श्वानाच्या पिल्लाला रक्ताची गरज आहे. या पिल्लाला ताप आणि अॅनिमिया झाल्याचंही टाटा यांनी पोस्टमध्ये नमूद केलं आहे. रक्तदाता श्वानाच्या पात्रतेचे निकष देखील त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहेत आणि पोस्टच्या शेवटी त्यांनी मुंबईकरांनो मला तुमच्या मदतीची गरज आहे, असं भावनिक आवाहन केलं आहे.
रतन टाटा यांचीही पोस्ट व्हायरल झाली असून आतापर्यंत पोस्टला ४.८ लाख लाइक्स मिळाले आहेत. तसंच अनेक कमेंट्सही आहेत. काहींनी तर रक्तदानासाठी पात्रता निकषाजवळ जाणाऱ्या काहींचे नंबरही कमेंटमध्ये पोस्ट केले आहेत. तर एकानं एक कोट्यधीश उद्योगपती एका श्वानाचा जीव वाचवण्यासाठी पोस्ट करतो ही गोष्ट खूप प्रेरणादायी आणि कौतुकास्पद असल्याचं म्हटलं आहे. जर रतन टाटांसारखा व्यक्ती प्राण्यांप्रती इतका संवेदनशील वागू शकतो तर यातून सर्वांनी बोध घेण्यासारखं आहे असंही एकानं म्हटलं आहे.
संकटात असलेल्या श्वानांची मदत करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्याची रतन टाटा यांची ही पहिलीच वेळ नाही. याआधी, त्यांनी इंस्टाग्रामच्या मदतीनं एका श्वानाला त्यांच्या मालकापर्यंत पोहोचवण्यात मदत केली होती. तसंच मुंबईतील ऐतिहासिक ताज पॅलेस हॉटेलबाहेरील जागेत असणाऱ्या श्वानांना हटकायचं नाही, असेही निर्देश त्यांनी हॉटेल कर्मचाऱ्यांना दिले होते. हेही हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकानं सोशल मीडिया पोस्टमधून सर्वांसमोर आणलं होतं. तेव्हाही टाटा यांच्या संवेदनशील मनाचं कौतुक केलं होतं.