मुंबई : आयएएस अधिकारी संजीव जयस्वाल यांच्यावर ईडीने ज्या पद्धतीने कारवाई केली, ती अयोग्य होती. एकदम त्यांच्या घरी धडक मारणेही योग्य नव्हते, अशा शब्दांत काही वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांनी मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्याकडे अलीकडेच नाराजी व्यक्त केली. काही निवडक अधिकारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही भेटले. आता आयएएस अधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार असल्याची माहिती आहे.
एखाद्या प्रकरणात आयएएस अधिकाऱ्याचे नाव आल्यानंतर चौकशी करणे याला आमचा विरोध नाही; पण ते आरोपी आहेतच अशा पद्धतीने त्यांच्या घरी काही तास ईडीच्या पथकाने चौकशी करणे, कुटुंबातील सदस्यांना वेठीस धरणे योग्य नाही, अशी नाराजी आयएएस अधिकारी बोलून दाखवत आहेत. ठाकरे गट आणि भाजपमधील वादाची किनार असलेल्या तसेच मुंबई पालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तेथील व्यवहारांवर सरकारने आपली नजर करडी केली आहे. कोरोनाकाळात देण्यात आलेल्या विविध कंत्राटांची चौकशी केली जात असून, त्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी पोलिसांची विशेष टीम तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर सक्तवसुली संचालनालयाने महापालिकेतील अधिकाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे. मात्र, अशा प्रकारे राजकारणात सनदी अधिकाऱ्याचा बळी घेणे योग्य नसल्याचे मत एका सनदी अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केेले.
जयस्वाल चुकले असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी; पण त्यावेळी परिस्थिती काय होती आणि त्यातून काय निर्णय घेण्यात आला, याचा विचार व्हायला हवा. एखाद्याला लक्ष्य करून त्याच्यावर कारवाई करणे चुकीचे असल्याचे एका निवृत्त सनदी अधिकाऱ्याने सांगितले.