मुंबई : गोवंडी येथील २० महिन्यांच्या २० किलो वजनाच्या इब्राहिम या बाळावर ४० दिवसांपूर्वी स्थूलपणा कमी करण्यासाठी लागणारी शस्त्रक्रिया हाजीअली येथील रुग्णालयात करण्यात आली. त्यानंतर महिन्याला दीड ते दोन किलोने वाढत जाणारे त्याचे वजन शस्त्रक्रियेनंतर मात्र केवळ २५० ग्रॅम इतकेच वाढले आहे.
त्याचे वजन कमी झाले नसले तरी वजन वाढ रोखण्यात डॉक्टर यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. इब्राहिमवरील शस्त्रक्रिया भारताच्या वैद्यकीय विश्वात शोधनिबंधात नोंद होणारी दुसरी घटना आहे. इब्राहिमची सुरुवातीला सर्वसामान्य मुलाप्रमाणे वाढ होत होती. अगदी आठ महिन्यांपर्यंत त्याचे वजन ६-७ किलो होते. मात्र, त्यानंतर प्रत्येक महिन्याला त्याचे वजन वाढायला लागले. त्यानंतर त्याला वाढत्या वजनाचा इतका त्रास सुरू झाला होता की दर महिन्याला त्याला २-३ दिवसांसाठी राजावाडी रुग्णलयात दाखल करावे लागत असे. इब्राहिमचे वडील युसूफ खान रोजंदारीवर काम करत असून त्यांची परिस्थिती बेताचीच आहे. युसूफ खान यांनी शस्त्रक्रियेचा खर्च परवडत नसल्याने त्यांनी क्राऊड फंडिंगचा आधार घेतला होता.
बाळावर शस्त्रकिया करणारे स्थूलत्व शल्यचिकित्सक डॉ. संजय बोरुडे यांनी सांगितले की, इब्राहिम या बाळावर शस्त्रक्रिया करण्यापूर्वी खूप वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. हार्मोन्सतज्ज्ञ डॉ. प्रशांत पाटील यांनी या विषयावर खूप संशोधन केले. तेव्हा त्यांना इब्राहिमचे भूक नियंत्रित करणारे लेप्टिन हार्मोन्स कार्यान्वित नसल्याचे निदान झाले. त्याला सतत भूक लागायची आणि तो खात राहायचा. त्यामुळे त्याचे वजन वाढतच होते. सध्या बाळाचे वजन कमी झाले नसले तरी त्याची वजनवाढ थांबली आहे.