प्रभादेवी आणि परळला पूर्व-पश्चिम जोडणारा प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील एल्फिन्स्टन पूल उद्या शुक्रवार २५ एप्रिल रात्री ९ वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद होणार आहे. १२५ वर्ष जुन्या या पुलाचं पाडकाम करुन त्याजागी एमएमआरडीए नवा डबलडेकर पुल उभारणार आहे. हे काम पुढील दोन वर्ष चालणार आहे. त्यामुळे पुढील दोन वर्ष याभागात मुंबईकरांनावाहतूक कोंडीला सामोरं जावं लागणार आहे.
पुलाच्या पाडकामाला स्थानिकांचा मात्र विरोध आहे. आधी १० एप्रिलला पूल बंद होणार अशी माहिती समोर आली होती. पण पूल पाडण्याआधी हरकती आणि सूचना प्रशासनाने मागवल्या होत्या. त्यासाठी १३ एप्रिलपर्यंतची वेळ देण्यात आली होती. त्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून पुलाच्या पाडकामाला विरोध करत साखळी उपोषणही केलं गेलं. त्यानंतर आता प्रशासनाकडून पुलाच्या पाडकामावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. शुकवारपासून हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला जाईल. त्यानंतर टप्प्याटप्प्यात याच्या पाडकामाला सुरुवात केली जाईल.
एल्फिन्स्टन ब्रिज वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यानंतर पर्यायी मार्ग म्हणून वाहतूक विभागाकडून काही बदल करण्यात आले आहेत. करी रोड पुलावरील वाहतुकीसाठी वेळ निश्चित करण्यात आली आहे. करी रोड पुलावरुन सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत प्रभादेवी आणि लोअरपरळच्या दिशेने अशी एकेरी वाहतूक सुरू राहील. तर दुपारी ३ ते रात्री ११ वाजेपर्यंत टाटा आणि केईएम रुग्णालयाच्या दिशेनं एकेरी वाहतुकीसाठी खुला राहिल. त्यानंतर रात्री ११ ते सकाळी ७ वाजेपर्यंत पूल दोन्ही दिशेच्या वाहतुकीसाठी खुला असणार आहे.
१२५ वर्ष जुना एल्फिन्स्टन ब्रिज इतिहासजमा होण्याआधी शेवटची भेट-
करी रोड पुलावरील या बदलासोबतच पर्यायी मार्ग म्हणून दादरचा टिळक ब्रिज आणि चिंचपोकळी ब्रिजचा पर्याय उपलब्ध आहे. असं असलं तरी एल्फिन्स्टन ब्रिजवरील दररोजची रहदारी पाहता येथील वाहतुकीचा भार इतर पुलांवर येणार असल्यानं मुंबईकरांना मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागू शकतं.