मुंबई आयआयटी रेखाटणार पोलिसांच्या घरांचे आराखडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 04:50 AM2017-11-30T04:50:21+5:302017-11-30T04:50:24+5:30

पोलीस विभागाच्या इमारती आणि गृहप्रकल्प जलदगतीने पूर्ण करतानाच तांत्रिकदृष्ट्या मजबूत आणि आकर्षक बांधकाम आराखडे करण्याची जबाबदारी आयआयटी मुंबईने उचलली आहे.

 Mumbai IIT design plans to plot | मुंबई आयआयटी रेखाटणार पोलिसांच्या घरांचे आराखडे

मुंबई आयआयटी रेखाटणार पोलिसांच्या घरांचे आराखडे

Next

मुंबई : पोलीस विभागाच्या इमारती आणि गृहप्रकल्प जलदगतीने पूर्ण करतानाच तांत्रिकदृष्ट्या मजबूत आणि आकर्षक बांधकाम आराखडे करण्याची जबाबदारी आयआयटी मुंबईने उचलली आहे. राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाने अलीकडेच आयआयटी मुंबईबरोबर याबाबतचा सामंजस्य करार केला.
पोलीस गृहनिर्माण महामंडळाने पोलिसांसाठी सुमारे एक लाख घरे बांधण्याचे ठरविले आहे. ही घरे जलदगतीने पूर्ण व्हावीत, यासाठी तंत्रज्ञानाची आवश्यकता असून त्यासाठी हा करार करण्यात आला आहे. या करारानुसार तांत्रिकदृष्ट्या मजबूत, दीर्घकाळ टिकणाºया, कार्यपूरक व हरित इमारत संकल्पनेनुसार सौंदर्यदृष्ट्या आकर्षक असे बांधकामाचे आराखडे ‘आयआयटी’ तयार करणार आहे. त्याशिवाय तांत्रिक परीक्षण, इमारतीच्या आराखड्याची तपासणी पद्धती, कामाची तपासणी व त्याचे समीक्षण करणे, आधुनिक किफायतशीर बांधकाम तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण आदी तांत्रिक बाबींबाबतही ‘आयआयटी’ मार्गदर्शन करणार आहे.
पोलिसांसाठी सदनिका, पोलीस विभागाच्या प्रशासकीय इमारती, पोलीस ठाणी, कारागृहे आदींचे बांधकाम या महामंडळाच्या वतीने करण्यात येते. हे काम जलदगतीने व्हावे, असा या सामंजस्य करारामागील उद्देश आहे. सध्या राज्यात महामंडळामार्फत मोठे ३६ प्रकल्प सुरू आहेत. त्यामध्ये ३ हजार ३४४ सदनिका, १ हजार ६५२ क्षमतेची ८ वसतिगृहे, ११ पोलीस ठाणी, ४० वर्गखोल्यांच्या ६ इमारती, ९ प्रशासकीय इमारती, १ समादेशक कार्यालय, ४ कौशल्य विकास केंद्रे आणि एक महासंचालनालयीन कर्मचाºयांसाठी शिबिर कार्यालय इमारतीचा समावेश आहे.
पोलीस महासंचालक तथा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व्ही. डी. मिश्रा यांनी या करारासाठी पुढाकार घेतला असून, महामंडळाचे मुख्य अभियंता महेश डेकाटे आणि ‘आयआयटी’चे रवी सिन्हा हे अंमलबजावणी करणार आहेत.

Web Title:  Mumbai IIT design plans to plot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.