Join us

मुंबई आयआयटीला टॉपर्सची पसंती; 'कम्प्युटर सायन्स'ला प्रथम प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 10:10 AM

केंद्रीय स्तरावर शैक्षणिक संस्थांचे रैंकिंग ठरविणाऱ्या नॅशनल इन्स्टिट्युशनल रैंकिंग फ्रेमवर्कमध्ये (एनआयआरएफ) आयआयटी- मद्रास पहिल्या क्रमांकावर आहे.

मुंबई: केंद्रीय स्तरावर शैक्षणिक संस्थांचे रैंकिंग ठरविणाऱ्या नॅशनल इन्स्टिट्युशनल रैंकिंग फ्रेमवर्कमध्ये (एनआयआरएफ) आयआयटी- मद्रास पहिल्या क्रमांकावर आहे. परंतु, अभ्यासक्रम निवडताना देशातील टॉप रैंकर्स मुंबईच्या आयआयटीलाच झुकते माप देताना दिसतात.

देशभरातील २३ आयआयटीच्या निवडीत यंदा 'जेईई-अ‍ॅडव्हान्स'मध्ये आलेल्या पहिल्या शंभरातील ६८ विद्यार्थ्यांनी मुंबईला पसंती दिली आहे. या विद्यार्थ्यांनी मुंबई- आयआयटीत कम्प्युटर सायन्स या शाखेत प्रवेश घेतला आहे.

मुंबई-आयआयटीत कम्प्युटर सायन्सला प्राधान्य देण्याचा ट्रेंड यंदाही कायम आहे. आयआयटींची संख्या २३ वर गेली असली तरी प्रवेशाकरिता मुंबईसह दिल्ली, मद्रास, कानपूर, खरगपूर, गुवाहाटी, रूरकी या जुन्या सात आयआयटींनाच प्राधान्य दिले जात आहे.

'जेईई अ‍ॅडव्हान्स'मधून देशातील २३ आयआयटीचे प्रवेश निश्चित केले जातात, या संस्थांमधील एकूण १७ हजार ७४० जागांसह एकूण १२१ केंद्रीय शिक्षण संस्थांमधील जवळपास ६० हजार जागांकरिता आयआयटी-मद्रासकडून ही केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. त्यात मुंबई खालोखाल दिल्लीला विद्यार्थ्यांनी पसंती दिली आहे.

'जेईई-अ‍ॅडव्हान्स 'मध्ये पहिल्या शंभरातील २७ व्या क्रमांकावर असलेल्या विद्यार्थ्याने दिल्ली आयआयटीत कम्प्युटर सायन्सला प्रवेशासाठी प्राधान्य दिले आहे. दिल्ली-आयआयटीतील या शाखेचा कटऑफ ११६ इतका आहे.

गेल्या दोन वर्षांचा ट्रेंड कायम-

२०२३ मध्ये पहिल्या १०० पैकी ६७ विद्यार्थ्यांनी मुंबई आयआयटीमध्ये कम्प्युटर सायन्सची निवड केली होती, तर, २०२२ मध्ये पहिल्या १०० पैकी ६९ विद्यार्थ्यांनी याच विषयाला पसंती दिली होती.

दिल्लीनंतर विद्यार्थ्यांची पसंती आयआयटी-मद्रासला आहे. या ठिकाणी कम्प्युटर सायन्स या अभ्यासक्रमाला जेईई-अ‍ॅडव्हान्सच्या गुणवत्ता यादीत ७६ व्या क्रमांकावर असलेल्या विद्यार्थ्याने पहिला प्रवेश निश्चित केला, तर, आयआयटी- कानपूरमध्ये गुणवत्ता यादीत १२०व्या क्रमांकावर असलेल्या विद्यार्थ्याने कम्प्युटर सायन्स या शाखेत प्रवेश निश्चित केला आहे.

पुढील प्रवेश फेरी २७ जूनला-

आयआयटींमधील प्रवेश गुणवत्ता यादीतील २४,६५३ क्रमांकावर बंद झाला आहे, तर एनआयटीचे प्रवेश सात लाखांहून अधिक रॅकवर बंद झाले. पाच प्रवेश फेऱ्यांमध्ये हे प्रवेश केले जाणार आहेत. पुढील प्रवेश फेऱ्या २७ जून, ७ जुलै, १० जुलै आणि १७ जुलैला होणार आहेत, असे आयआयटीकडून सांगण्यात आले.

टॅग्स :मुंबईआयआयटी मुंबईविद्यार्थी