- सीमा महांगडे/श्रीकांत जाधव
मुंबई : कोट्यवधींचा खर्च करून मुंबईत सुशोभीकरण सुरू असतानाच दुसरीकडे मोक्याच्या आणि दर्शनी जागांवर होर्डिंग्ज, बॅनरबाजी करून मुंबई विद्रुप करण्याचे काम केले जात आहे. विशेषतः राजकीय पक्षांकडून जागोजागी होर्डिंग्ज, बॅनरबाजी केली जात आहे, त्यामुळे मुंबईची रया घालावली जात आहे. मुळात मुंबईत अवैध होर्डिंग लावण्यावर निर्बंध आहेत. मात्र, तरीही मोकळ्या जागा व्यापल्या जात आहेत. राजकीय पुढाऱ्यांचे वाढदिवस, सभा, मोर्चे यांसह विविध कार्यक्रमांच्या जाहिरातींमुळे बकालपणा वाढतच असून, आता काही महिन्यात लागू होणाऱ्या महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान याचे प्रमाण आणखी वाढतच जाणार आहे.
दोन वर्षांनी ऑडिट बॅनर्स आणि पोस्टरसाठी पालिकेची परवानगी नसते आणि तसे पोस्टर्स आणि बॅनर्स हे अनधिकृत प्रकारातच गणले जातात. दर दोन वर्षांनी लावण्यात आलेल्या होर्डिंग्जचे ऑडिट होते. ऑडिटमध्ये वाहतूक विभागाची परवानगी, विमा संरक्षण, लायसन्स अपडेट केले का, शुल्क भरले की नाही याची माहिती घेण्यात येते. ते नियमानुसार लावण्यात आले नसेल तर प्रथम नोटीस बजावण्यात येते. त्यानंतर दुर्लक्ष केल्यास संबंधितांचे लायसन्स रद्द करण्यात येते.
३० दिवसांची मुदतमुंबईच्या रस्त्यांवरील जंक्शनवर होर्डिग्ज लावण्यासाठी वाहतूक विभागाची परवानगी, विमा संरक्षण, शुल्क भरले की नाही याची माहिती घेण्यात येते. यापैकी काही त्रुटी आढळल्यास नोटीस बजावल्यानंतर ३० दिवसांची मुदत देण्यात येते. त्यानंतर दुर्लक्ष केल्यास संबंधितांचे लायसन्स रद्द करण्यात येते.
तक्रारी येतात, पण... होर्डिंग अवैध असल्याच्या तक्रारी पालिकेकडे नोंदवल्या जातात आणि तक्रारीनंतर पालिकेकडून ती बेकायदेशीर होर्डिंग्ज काढण्याची कारवाई केली जाते. मात्र, त्यानंतरही नियम सतत धाब्यावर मारण्याचे प्रकार होतच असतात.
१ हजार ४५ अधिकृतअधिकृत होर्डिंग्जची संख्या १ हजार ४५ इतकी असून, पालिकेकडून या परवान्यासाठी शुल्क आकारले जाते.विशिष्ट काळासाठी करण्यात येणारे हे शुल्क प्रति महिना आकारले जात असून आकार, जाहिरातीचा प्रकार यावरून त्याचे दर ठरविले जात असतात. होर्डिंग्जवरील कारवाईसाठी प्रत्येक वॉर्डनिहाय एक वाहन आणि निरीक्षकाची नेमणूक केलेली असते.
काेठे कारवाईची गरजदादर कोहिनूर मिल, वरळी येथील आचार्य अत्रे चौक, वांद्रे खेरवाडी सिग्नल, चेतना कॉलेज समोर, धारावी सायन रेल्वे स्थानक, पिवळा बंगला, टी जंक्शन, चेंबूर नाका अशा ठिकाणी बॅनरबाजी करून परिसर विद्रुप केला जात आहे.
कामे रात्री १ ते ४ या वेळेतबॅनर, फ्लेक्स तयार केल्यानंतर ते लावण्यासाठी पैसे घेऊन काम करणारे अनेक तरुण असतात, तर कधी बॅनर, फ्लेक्स तयार करणारेदेखील ते लावण्याचे काम करतात. विशेषतः अशी कामे रात्री १ ते ४ या वेळेत केली जातात.