Mumbai: मुसळधार पावसात मुंबईची मेट्रो सुपर फास्ट, लाखो मुंबईकरांनी केला प्रवास
By सचिन लुंगसे | Published: July 20, 2023 02:17 PM2023-07-20T14:17:57+5:302023-07-20T14:18:52+5:30
Mumbai Metro: दिवसभर पावसाचे धुमशान सुरु असताना मुंबई मेट्रो विनाव्यत्यत सुरळीत सुरु होती. यामुळे बहुतांश मुंबईकरांनी मुंबई मेट्रोला पसंती दाखवली आणि त्याने प्रवास केला.
मुंबई - दिवसभर पावसाचे धुमशान सुरु असताना मुंबईमेट्रो विनाव्यत्यत सुरळीत सुरु होती. यामुळे बहुतांश मुंबईकरांनी मुंबई मेट्रोला पसंती दाखवली आणि त्याने प्रवास केला. मुंबई मेट्रो २ अ आणि ७ या दोन्ही मार्गिकेने काल एका दिवसात तब्बल २ लाख १४ हजारांच्या पलीकडे प्रवासी आकडा पार केला. मुंबई मेट्रोने मान्सून पूर्व केली होती आणि त्याचाच प्रत्यय कालच्या मुसळधार पावसात मुंबईकरांना आला. सर्वाधिक दैनंदिन प्रवासी संख्या २ लाखाच्या वर गेली होती. काल २ लाख, १४ हजाराहून अधिक प्रवाशांनी मेट्रोने प्रवास करत स्वतःचा रेल्वे आणि वाहतूक कोंडीपासून बचाव केला.
मुंबईत मंगळवार पासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. बुधवारी देखील दिवसभर मुसळधार पावसाची हजेरी कायम राहिलेली पाहायला मिळाली. मात्र या मुसळधार पावसामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला मोठा फटका बसला. मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं होतं. ज्यामुळे वाहतूककोंडीचा सामना मुंबईकरांना करावा लागला. त्याचसोबत अनेक रेल्वे स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाले, रेल्वे रुळांवर देखील पाणी साचल्याचे दृश्य समोर आले. एकीकडे रेलवाहतूक ठप्प झाली होती तर दुसरीकडे पश्चिम द्रुतगती मार्गावर देखील मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली.
मुंबई मेट्रोची सेवा सुरळीत सुरु असताना कोणतीही तक्रार नोंदवण्यात आलेली नाही. पावसाची परिस्थिती बघता अधिक ३ मेट्रोच्या गाड्या सेवेसाठी तैनात ठेवण्यात आल्या होत्या, मात्र तशी परिस्थिती उद्भवली नाही आणि नियमित सुरु असलेल्या मेट्रो ट्रेन्सने मुंबईकरांची कठीण काळात सेवा केली. मान्सून कंट्रोल रूमच्या साहाय्याने मेट्रोच्या सेवेवर शिक्षित तंत्रज्ञांकडून लक्ष ठेवलं जात होत. जे ॲनिमोमीटर बसवण्यात आले आहेत, त्यांच्या साहाय्याने पावसाचा आणि वाऱ्याचा अंदाज घेत मेट्रोची सेवा विनाव्यत्यत सुरु होती. याचा फायदा मुंबईकरांना झाला, आणि प्रवाशांनी पहिली पसंती मुंबई मेट्रोला दाखवली.
प्रवाशांच्या सुरक्षिततेत दक्षता राखण्यासाठी ६४ सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांच्या मदतीने २४ तास मॉनिटरिंग केलं जातं. ज्यामुळे आपत्कालीन परिस्थिती त्वरित नियंत्रणात आणता येऊ शकते.