रतींद्र नाईक
मुंबई - तुर्की सिरियामध्ये भूकंपाने हाहाकार उडाला. या भूकंपात हजारो नागरिकांचा बळी गेला. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. हा भूकंपाचा धोका पाहता मुंबई भूकंपाच्या दृष्टिकोनातून सुरक्षित आहे का? मुंबईत भूकंप झाला तर काय होईल? मुंबईतील टोलेजंग टॉवर भूकंपाचा झटका सहन करू शकतील का ? याचा घेतलेला हा धांडोळा.
धोकादायक इमारतींवरील कारवाईला स्थगितीमुंबईत दिवसेंदिवस टोलेजंग टॉवर उभे राहत असून, येथील अनेक इमारती ५० ते ६० वर्षांपूर्वीच्या असून, आजही धोकादायक स्थितीत उभ्या आहेत. पालिकेने अशा इमारतींना घरे रिकामी करण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, रहिवाशांनी नोटिसीला स्थगिती मिळवली आहे.
भूकंपरोधक बांधकाममुंबईत ३० ते ४० मजली टॉवर पाहता या इमारती भूकंपाचे कमी तीव्रतेचे धक्के सहन करू शकतील, असे त्यांचे बांधकाम करण्यात आले आहे.
३१ भूकंप प्रवणक्षेत्रमुंबई आणि आसपासच्या परिसरात असे एकूण ३१ भूकंप प्रवणक्षेत्र आहे. गोवंडी, शिवाजीनगर, घाटकोपर, भांडुप, विद्याविहार आणि मुलुंड येथील काही भागांचा समावेश आहे. नवी मुंबई, ठाण्यातील काही भाग हेही भूकंपप्रवण क्षेत्रात मोडतात.
मुंबईतील बऱ्याच जुन्या इमारतींना भूकंपाचा धोका असून, सध्या अनेक इमारतींचे बांधकाम हे अर्थक्वेक कोडनुसार केले जाते. त्यामुळे जुन्या इमारतीवगळता नवीन इमारतींचे फारसे नुकसान होणार नाही.- रमेश प्रभू, अध्यक्ष, महाराष्ट्र सोसायटी वेल्फेअर असोसिएशन
मुंबईतील इमारती फार तर ६ रिश्टर स्केलपर्यंतचा भूकंप सहन करु शकतात. २०००च्या अगोदरच्या इमारतींचे नुकसान मात्र नक्कीच होईल. इमारतींचे बीम आणि कॉलममध्ये स्टीलचा जास्त वापर केल्यास इमारतीचा सांगाडा शाबूत राहील, जास्त नुकसान होणार नाही.-डी. आर. हडदरे, माजी चीफ टेक्निकल ऑफिसर, महारेरा
आयआयटी मुंबईचा अभ्यास७.५ रिश्टर स्केलचा भूकंप तुर्कीत नुकताच झाला. १६ व्या शतकात याच तीव्रतेचा भूकंप मुंबईत झाल्याची नोंद आहे. व प्रचंड जीवितहानी झाली. मुंबईसह ठाणे, आणि पालघर भूकंपाचे लहान धक्के जाणवले आहेत. २००८ मध्ये काही संशोधकांच्या मदतीने भूकंपावर अभ्यास केला. मुंबई हे भूकंपाच्या नकाशावर झोन चारमध्ये येते.