आराेग्य विभाग; जम्बो कोविड केंद्रे ३१ मार्चपर्यंत सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शहर, उपनगरात कोरोना संसर्ग आटोक्यात आल्यानंतर अनलाॅकचा पुढचा टप्पा सुरू झाला आहे. या टप्प्यानंतर पुन्हा एकदा मुंबईत कोरोनाच्या रुग्णसंख्येत १० ते १२ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. दरम्यान, यापूर्वीच खबरदारी म्हणून पालिकेने मुंबईतील जम्बो कोविड केंद्रे ३१ मार्चपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
पालिकेचे अतिरिक्त आय़ुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, मागील २-३ दिवसांपासून काेराेनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे. मात्र पालिका प्रशासनाने रुग्णवाढीचा धोका ओळखून यंत्रणा सज्ज केली आहे. त्यामुळे शहर, उपनगरातील रुग्णालये किंवा कोविड केंद्रात रुग्ण दाखल करण्याची सेवा उपलब्ध आहे. सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू झाल्यानंतर रुग्णवाढ हाेत असल्याचे निदर्शनास आल्यास प्रवासावर निर्बंध लावण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे, त्यानुसार लवकरच निर्णय घेण्यात येईल.
शहर, उपनगरातील रुग्णवाढीच्या कारणांचे विश्लेषण केले असता, मागील काही दिवसांत परदेशातील पर्यटक मुंबईत येण्याचे प्रमाण वाढते आहे. हवाई आणि रेल्वे वाहतुकीच्या माध्यमातून वर्दळ वाढत आहे. दिल्ली, गुजरात, केरळ, राजस्थान आणि गोवा येथून येणाऱ्या प्रवाशांकडे प्रशासनाचे विशेष लक्ष आहे.
* नागरिकांकडून मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन
लोकल सेवा सुरू झाल्याने गर्दीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून सामान्य नागरिकांकडून मास्क घालणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, सुरक्षित अंतर राखणे अशा कोरोनाविषयक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जात नसल्याचे उघडकीस आले आहे. याकडे प्रशासनाने आता गांभीर्याने लक्ष दिले असून जनजागृतीसह कारवाईवर भर देण्यात येत आहे.
......................
.............................