Join us

Income Tax Raids : राजकीय फंडिंग प्रकरणी आयकर विभागाची मोठी कारवाई, मुंबईत 8 ठिकाणी छापे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2022 11:48 AM

Income Tax Raids : दोन हजार कोटी रुपयांच्या करचुकवेगिरीचे हे प्रकरण आहे. याप्रकरणी देशभरात 87 छोट्या राजकीय पक्षांवर छापे टाकण्यात आले आहेत.

मुंबई : राजकीय फंडिंग प्रकरणी आयकर विभागाने मोठी कारवाई  (Income Tax Raids) केली आहे. याप्रकरणी आयकर विभागाने मुंबईतील 8 ठिकाणी छापे टाकले आहेत. ज्यांनी छोट्या राजकीय पक्षांकडून देणग्या देऊन रोख रक्कम घेतली, त्यांच्यावर छापे टाकले जात आहेत. दोन हजार कोटी रुपयांच्या करचुकवेगिरीचे हे प्रकरण आहे. याप्रकरणी देशभरात 87 छोट्या राजकीय पक्षांवर छापे टाकण्यात आले आहेत. दरम्यान, निवडणूक आयोगाने नोंदणीकृत अनधिकृत राजकीय पक्षांची माहिती आयकर विभागाला दिली होती. यामध्ये हे राजकीय पक्ष चार ते पाच टक्के कमिशन घेऊन देणग्यांचे रोखीत रूपांतर करत होते. याप्रकरणी आयकर विभागाच्या रडारवर काही चार्टर्ड अकाउंटंटही आहेत.

गुरूवारी मुंबईतील सायन आणि बोरिवली परिसरात आयकर विभागाने छापेमारी केली. विशेष म्हणजे सायन झोपडपट्टी भागात ही कारवाई सुरू असल्याची माहिती आहे. झोपडपट्टीमध्ये छापा मारलेले ठिकाण हे राजकीय पक्षाचे कार्यालय आहे. फक्त 100 चौफूट असलेल्या झोपडीवर एका पक्षाचे नोंदणीकृत कार्यालय आहे.बँक रेकॉर्डनुसार, या पक्षाला मागील दोन वर्षात 100 कोटींची देणगी मिळाली होती. हा राजकीय पक्ष नोंदणीकृत असला तरी त्याला निवडणूक आयोगाची परवानगी नाही. 

दुसरीकडे, बोरिवलीतील एका लहान घरातून एका पक्षाचे कार्यालय संचलित केले जात होते. या पक्षाने विविध व्यक्ती आणि संस्थांकडून 50 कोटींचा निधी घेतला होता. त्यानंतर या पैशांचे वाटप विविध संस्थांमध्ये करण्यात आले. याशिवाय, औरंगाबादमध्येही सलग दुसऱ्या दिवशी छापेमारी सुरू आहे. मिड-डे मील डिलिव्हरी व्यापारी सतीश व्यास यांच्या घर, कार्यालय आणि हॉटेलवर छापे टाकण्यात येत आहेत. राजस्थानमधील शाळांमधील माध्यान्ह भोजन घोटाळ्याची लिंक औरंगाबादमधील असल्याचे समजते. राजकीय फंडिंग प्रकरणी काल दिल्ली, राजस्थान, उत्तराखंड, महाराष्ट्र, बेंगळुरू येथे आयकर छापे टाकण्यात आले. आयकर विभागाने देशभरात 100 हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत.

दरम्यान, जूनमध्ये निवडणूक आयोगाने अशा 11 छोट्या राजकीय पक्षांची यादी सीबीडीटीला पत्राद्वारे सादर केली होती. या राजकीय पक्षांकडून निधीचा गैरवापर होत असल्याची तक्रार या पत्रात करण्यात आली आहे. या पक्षांकडून निधीच्या नावावर चुकीच्या पद्धतीने मोठी रक्कम वसूल केली जात होती. त्याचवर्षी निवडणूक आयोगाने अशा पक्षांची नोंदणी रद्द करण्याचे आदेश दिले होते. हे पक्ष नोंदणीकृत असले तरी अस्तित्वात नव्हते. कारवाईदरम्यान त्यांच्या पत्त्यांवर पाठवलेला मेल परत आला. हे पक्ष बेकायदेशीरपणे देणग्या घेऊन त्यात गडबड करत होते. अशा पक्षांची आर्थिक चौकशी करण्यास सांगितले होते. त्याआधारे आयकर विभाग देशाच्या विविध भागात छापे टाकत आहे. अशा राजकीय पक्षांच्या एंट्री ऑपरेटरवरही आयकर विभाग छापे टाकत आहे.

टॅग्स :इन्कम टॅक्सधाड