Mumbai: सिनेट निवडणुकीत बोगस मतदार नोंदणीची चौकशी करा, आशिष शेलार यांची मागणी
By मनोहर कुंभेजकर | Updated: August 19, 2023 00:30 IST2023-08-19T00:29:40+5:302023-08-19T00:30:20+5:30
Mumbai: मुंबई विद्यापीठातर्फे नोंदणीकृत पदवीधर मतदारांची सुधारित अंतिम यादी घोषित करण्यात आली आहे, त्या अंतिम यादीमध्ये प्रथम दर्शनी काही बोगस आणि दुबार नावे असल्याचे निदर्शनास आलेले आहे.

Mumbai: सिनेट निवडणुकीत बोगस मतदार नोंदणीची चौकशी करा, आशिष शेलार यांची मागणी
- मनोहर कुंभेजकर
मुंबई - मुंबई विद्यापीठातर्फे नोंदणीकृत पदवीधर मतदारांची सुधारित अंतिम यादी घोषित करण्यात आली आहे, त्या अंतिम यादीमध्ये प्रथम दर्शनी काही बोगस आणि दुबार नावे असल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्याचबरोबर अनेक मतदारांची नावे ही तीन वेळा नमुद असल्याचे निदर्शनास आले आहे.त्यामुळे या प्रकरणी चौकशी व्हावी अशी आमची मागणी असल्याचे शेलार म्हणाले.
उबाठा गटाकडून ही बोगस मतदार नोंदणी झाली आहे, हा विद्यापीठाला बदनाम करण्याचा डाव आहे, असा आमचा आरोप आहे. त्यांनी बोगस नावे डिलीट करावी म्हणजे कुणाचा विजय होतो ते कळेलच. त्यांना स्वतःच्या पराभवाची भीती वाटतेय त्यांनी पराभवावर बोलू नये असा टोला शेलार यांनी लगावला.
आदित्य ठाकरे यांनी बोगस मतदार नोंदणी केली ती डिलीट करावी. बोगस मतदार घुसवण्याचे पाप तुम्ही केले आहे. जर निवडणूकीची एवढीच खूमखूमी असेल तर ही बोगस नावे काढा आम्ही तुम्हाला चारीमुंड्या चित करु असा इशारा त्यांनी दिला.
खा. संजय राऊत मुंबई महापालिका निवडणुका घ्या असे वारंवार सांगत आहेत . मग त्यांनी कोर्टात दाखल केलेली याचिका मागे घ्यावी. २२७ प्रमाणे वाँर्ड रचना मान्य आहे हे जाहीर करावे तसेच ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक व्हावी अशी जर त्यांची भूमिका असेल तसेही त्यांनी सांगावे. आम्ही ओबीसी आरक्षण मिळावे या बाजूने आहोत, असेही आमदार अँड आशिष शेलार यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत स्पष्ट केले.