मनोहर कुंभेजकर
मुंबई - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय व आंतरदेशीय विमानतळाच्या नावात महाराज ही उपाधीच निर्देशित करण्यात आलेली नाही. याप्रकरणी केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी दखल घेतली असून लोकसभा अधिवेशन संपण्यापूर्वी महाराज ही उपाधी या दोन्ही विमानतळाच्या नावात निर्देशित केली जाणार असल्याचे आश्वासन केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी दिल्याची माहिती खासदार गोपाळ शेट्टी यांनी सोमवारी सकाळी दिल्लीवरून लोकमतला दिली. या संदर्भात लोकमत ऑनलाईनवर आणि लोकमतमध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यावर या संदर्भात उत्तर मुंबईचे भाजपा खासदार शेट्टी यांनी लोकमतच्या सदर प्रतिनिधींशी दिल्लीवरून संपर्क साधला. लोकमतने यापूर्वी हा महत्वाचा विषय अनेकवेळा प्रभावीपणे मांडला होता.
लोकमतच्या वृत्ताची दखल घेऊन त्यांनी सांगितले की, आपण केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश शेट्टी यांची नुकतीच दिल्लीत भेट घेऊन त्यांच्याशी या महत्वाच्या विषयावर चर्चा करून एक शिवप्रेमी म्हणून महाराज ही उपाधी लवकर निर्देशित करण्याची आग्रही मागणी केली होती. खासदार गोपाळ शेट्टी यांनी गेल्या एक वर्षांपासून त्यांनी यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती सुरेश प्रभू यांना दिली.
केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री यांना पाठवलेले पत्र आणि त्याला केंद्रीय उड्डाण मंत्र्यांनी दिलेल्या उत्तराची कागदपत्रे त्यांनी सुरेश प्रभू यांना दिली. गेल्या वर्षी 8 मे 2017 रोजी आपण केंद्रीय हवाई मंत्री पी. अशोक गणपती राजू यांना आपण पत्र देऊन महाराज ही उपाधी या दोन्ही विमानतळाच्या नावात लवकर निर्देशित करण्याची आग्रही मागणी केली होती. आपल्या पत्राला मंत्री महोदयांनी 24 मे 2017 रोजी लेखी उत्तर देऊन ही बाब तपासून आपण ठोस कार्यवाही करू असे आश्वासन दिले होते. मात्र एक वर्षांचा कालावधी उलटून गेला तरी चार अक्षरी पण अत्यंत महत्वाचा महाराज हा शब्द केंद्रीय हवाई मंत्रालयाने टाकला नसल्याबद्धल त्यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांच्या निदर्शनास आणून देताच लोकसभेचे अधिवेशन संपण्यापूर्वी महाराज ही उपाधी निर्देशित करण्याचे ठोस आश्वासन मंत्री महोदयांनी आपल्याला दिल्याची माहिती खासदार गोपाळ शेट्टी यांनी दिली.
महाराज ही उपाधी निर्देशित करण्यासाठी वॉच डॉग फाउंडेशनचे विश्वस्त अँड. ग्राडफे पिमेटा व निकोलस अल्मेडा 1990 पासून लढा देत असून लोकमतने देखील हा विषय सातत्याने मांडला आहे. जर येत्या 8 दिवसात या दोन्ही विमानतळांच्या नावात महाराज ही उपाधी लागली नाही तर वॉच डॉग फाउंडेशन व आमचे सहार गावातील शिवप्रेमी सहार विमानतळाच्या बाहेर आमरण उपोषणाला बसतील असा इशारा पिमेटा व अल्मेडा यांनी दिला होता.