Join us

आजपासून मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव रंगणार; यंदा बांगलादेशची कंट्री ऑफ फोकस म्हणून निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 10:24 AM

मिफ्फमध्ये यंदा बांग्लादेशची ‘कंट्री ऑफ फोकस’ म्हणून निवड करण्यात आली असून, या विभागात ११ बांगलादेशी चित्रपटांचे विशेष पॅकेज दाखवले जाणार आहेत.

मुंबई : १७ व्या मुंबईआंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजेच ‘मिफ्फ’ला आज, रविवारपासून सुरुवात होणार आहे. भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सुरू असलेला अमृतमहोत्सव आणि शेजारील बांगलादेशाच्या स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवाची सांगड यंदा मिफ्फमध्ये घालण्यात आली आहे. मिफ्फमध्ये यंदा बांग्लादेशची ‘कंट्री ऑफ फोकस’ म्हणून निवड करण्यात आली असून, या विभागात ११ बांगलादेशी चित्रपटांचे विशेष पॅकेज दाखवले जाणार आहेत.

माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशनपटांना समर्पित असलेल्या मिफ्फचा उद्घाटन सोहळा वरळी येथील नेहरू केंद्रात होणार असून, चित्रपटांचे प्रसारण, फिल्म डिव्हिजनच्या संकुलात असलेल्या विविध अत्याधुनिक चित्रपटगृहांत होईल. आठवडाभर चालणाऱ्या या महोत्सवाला जगभरातील चित्रपट निर्माते-दिग्दर्शकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. या महोत्सवासाठी ३० देशांतून एकूण ८०८ प्रवेशिका आल्या आहेत. महोत्सवाच्या स्पर्धा विभागांत १०२ चित्रपट दाखविले जाणार आहेत. यापैकी ३५ आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धा गटांत आणि ६७ राष्ट्रीय चित्रपट स्पर्धा विभागांत असतील. 

महोत्सवातील सर्वोत्कृष्ट सिनेमाला सुवर्णशंख पुरस्कार आणि १० लाख रुपये रोख दिले जातील. दुसऱ्या क्रमांकावरील चित्रपटाला रौप्य शंख आणि पाच लाख रुपये पुरस्कार दिला जाईल. त्याशिवाय, चषक आणि प्रमाणपत्रही प्रदान केले जाईल. आयडीपीएच्या वतीने दिला जाणारा, विद्यार्थ्यांनी बनविलेला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार आणि उत्तम पदार्पण करणाऱ्या नवोदित दिग्दर्शकाला महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी दादासाहेब फाळके चित्रनगरी पुरस्कार दिला जाईल. याखेरीज माहितीपट क्षेत्रांत विशेष उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सिनेसृष्टीतील नामवंत दिग्गजांना १० लाख रुपये, चषक आणि प्रमाणपत्र असे स्वरूप असलेला प्रतिष्ठेचा डॉ. व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कारदेखील दिला जाणार आहे. आतापर्यंत, एस. कृष्णमूर्ती, श्याम बेनेगल, नरेश बेदी, विजया मुळये या मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

भारत आणि जपान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रामायण : द लिजेंड ऑफ प्रिन्स रामा’ या पहिल्या ॲनिमेशनपटाचेदेखील मिफ्फमध्ये विशेष सादरीकरण होणार आहे. चित्रपट प्रभागाचे (फिल्म्स डिव्हिजन) भारतातील माहितीपट संस्कृतीमधील योगदान, इमेज-नेशन या विशेष विभागात प्रदर्शित केले जाईल. ऑस्करच्या धर्तीवर या महोत्सवातही विशेष चित्रपट पॅकेजेस तयार करण्यात आली असून, त्यात  इटली आणि जपानमधील विशेष चित्रपट पॅकेज, इफ्फीच्या अलीकडील महोत्सवांमधील इंडियन पॅनोरमा यांचा समावेश आहे आणि हे  खास चित्रपटांचे विभाग रसिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरतील.

शेख हसीना यांच्या जीवनप्रवासावर चित्रपट-

‘कंट्री ऑफ फोकस’मध्ये समीक्षकांनी नावाजलेला पिपलू खान दिग्दर्शित ‘हसीना - अ डॉटर्स टेल’ या चित्रपटाचाही समावेश आहे. हा चित्रपट बांगलादेशच्या पंतप्रधान आणि ज्येष्ठ राजकीय नेत्या, शेख हसीना यांच्या जीवनकार्यावर आधारित आहे. बांगला मुक्ती संग्रामाच्या आठवणी ताज्या करणारे काही चित्रपटही यात आहेत. बांगला भूमी स्वतंत्र करण्यासाठी, तिथल्या लोकांनी दिलेले बलिदान आणि ७१च्या युद्धाच्या आठवणी सांगणारे ‘नॉट अ पेनी, नॉट अ गन’, ‘जोलो गुरीला’ हे चित्रपट दाखविले जाणार आहेत. हे चित्रपट बांगलादेश पाकिस्तानपासून मुक्त करणाऱ्या ७१च्या युद्धाची कथा सांगत असून ते बांगलादेशच्या नागरिकांना प्रेरणा देणारे ठरले आहेत. 

स्वातंत्र्यासाठी बांगलादेशच्या नागरिकांनी काय काय छळ आणि हालअपेष्टा सोसल्या, त्या वेदनांना या चित्रपटांनी वाचा फोडली आहे. दिलारा बेगम जॉली यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘जोथोरलिना’ या चित्रपटात बांगलादेश लेखिका, रोमा चौधरी यांनी, युद्धकाळात घालविलेल्या अत्यंत वेदनादायी आणि संघर्षमय आयुष्याची कथा सांगितली आहे. ‘कान पेटे रोई’ या माफिदुल हक यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात १९७१च्या युद्धकाळात झालेल्या अत्याचारांविरोधात खंबीरपणे उभ्या राहिलेल्या, एका गणिताच्या प्राध्यापकाची संघर्षमय कथा दाखविण्यात आली आहे आहे.

टॅग्स :मुंबईआंतरराष्ट्रीयबांगलादेश