Join us

मुंबईलाही ‘सावकारी’चा विळखा; विनापरवाना अव्वाच्या सव्वा व्याज वसुली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 1:39 PM

कारवाई करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ग्रामीण भागाप्रमाणे मुंबईतही सावकाराकडून जाच सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव अनेक घटनांमधून समोर येत आहे. अनेकजण विनापरवाना अव्वाच्या सव्वा व्याज लावून पैसे उकळत असल्याचेही कारवाईतून समोर येते. मुंबईतून शेकडो जणांकडे अधिकृत सावकारी परवाने आहे. मात्र त्याचा वापर योग्य रीतीने  होत नसल्याचे  महाराष्ट्र कर्जदार जामीनदार हक्क बचाव संघर्ष समितीचे म्हणणे आहे. त्यामुळे अशा सावकाराच्या कामकाजाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. त्यानुसार त्यांचा पाठपुरावा सुरू आहे. 

म्हणून थेट परवानेच होतात रद्द- नियमापेक्षा जास्त व्याज आकारणाऱ्या विरोधात तक्रारी किंवा गुन्हा दाखल होताच त्यांचे थेट परवानेच रद्द करण्यात येत आहे. आतापर्यंत अनेकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.

अपहरण करून हत्येचा प्रयत्न- वांगणी येथील रहिवासी असलेले राजेंद्र नागोटकर (५७) पालिकेच्या सी उत्तर विभागाच्या घनकचरा व व्यवस्थापन विभागात सफाई कामगार म्हणून कार्यरत आहेत. २०१४ मध्ये मित्राच्या ओळखीने जगदीश भादरका या सावकाराकडून ७ टक्के व्याजाने ५० हजार रुपये घेतले. ठरल्याप्रमाणे राजेंद्र हे दर महिन्याला ७ हजार रुपये देत होते. ५ वर्षे नियमितपणे पैसे दिलेसुद्धा, मात्र कोरोनामुळे कामावर जात नसल्याने राजेंद्र यांना व्याजाची रक्कम देणे शक्य झाले नाही.

कर्जाची दुप्पट वसुली करून मुलाला विकण्याची धमकी- अंधेरी कुर्ला रोड परिसरात ५९ वर्षीय तक्रारदार कुटुंबीयांसोबत राहतात. ६ वर्षांपूर्वी त्यांच्या २३ वर्षीय मुलाने उत्तमनकडून ४० हजार रुपये व्याजाने घेतले होते. त्यानुसार ते नियमित व्याज देत होते. यादरम्यान उत्तमनने त्यांच्याकडून ८० हजार रुपये वसूल केले. काही महिने व्याज  देणे राहिल्यामुळे त्यांना दमदाटी करण्यास सुरुवात केली. तसेच, मुलाला विकण्यासह, घर विकणार, खोट्या गुन्ह्यात अडकविण्याबरोबर जीवे मारण्याची धमकी दिली.

टॅग्स :मुंबई