Join us

हवा ही गुलाबी! माथेरानपेक्षा मुंबई थंड; मुंबई १४ तर माथेरान १५ अंश

By सचिन लुंगसे | Published: January 23, 2024 7:25 PM

माथेरानमध्ये १५ तर मुंबईत १४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

मुंबई: गुलाबी थंडीने मुंबईकरांना कवेत घेतले असून, मंगळवारी मुंबईचे किमान तापमान माथेरानपेक्षाही १ अंशाने कमी नोंदविण्यात आले आहे. माथेरानमध्ये १५ तर मुंबईत १४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली असून, आणखी दोन दिवस मुंबई गारेगार राहणार आहे. त्यानंतर मात्र किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येईल; आणि किमान तापमान २० ते २२ अंशावर जाईल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली. चालू मौसमाता मुंबईत मंगळवारी नोंदविण्यात आलेले १४ अंश किमान तापमान म्हणजे आतापर्यंतचे नीचांकी किमान तापमान आहे. यापूर्वी मुंबईचे किमान तापमान १६, १५ अंश नोंदविण्यात आले आहे. उत्तर भारतातून दक्षिण भारताकडे वाहणा-या गार वा-यामुळे मुंबईसह राज्यातील शहरांचे किमान खाली घसरत आहे. बुधवारसह गुरुवारी मुंबईत थंडी कायम राहील. नंतर मात्र किमान तापमान २० अंश नोंदविण्यात येईल. - सुनील कांबळे, प्रमुख, मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग १ फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रात थंडी जाणवणार आहे. मुंबईसह कोकण व उर्वरित महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यात पहाटेचे किमान तापमान १४ तर दुपारचे कमाल तापमान २८-३० म्हणजे दोन्हीही तापमाने त्यांच्या सरासरी इतकी किंवा त्या पेक्षाएखाद्या डिग्रीने कमी असू शकतात. विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात १ फेब्रुवारीपर्यंत पावसाची शक्यता नाही. मात्र विदर्भातील जिल्ह्यात २४ जानेवारीपर्यंत ढगाळ वातावरण राहील. तुरळक ठिकाणी अगदीच किरकोळ पावसाची शक्यता आहे. त्यामुळे तेथे थंडी कमी होईल. - माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ शहरांचे किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये

  • जळगाव ९.६
  • नाशिक १०.१
  • नंदुरबार १०.९
  • पुणे ११.४
  • महाबळेश्वर ११.५
  • मालेगाव ११.६
  • अहमदनगर ११.७
  • सातारा १२
  • छत्रपती संभाजी नगर १२.३
  • अलिबाग १३.७
  • सांगली १३.९
  • जेऊर १४
  • मुंबई १४.८
  • कोल्हापूर १५.१
  • डहाणू १५.३
  • माथेरान १५.८
  • जालना १७
  • रत्नागिरी १७.१
  • परभणी १७.२
  • पालघर १७.४
  • धाराशीव १८
  • सोलापूर १८
  • नांदेड १८.६ 
टॅग्स :मुंबई