मुंबई : घरादाराला झेंडूचे तोरण, तुळशीसमोर रांगोळी आणि उंच आकांक्षा घेऊन उभारल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याच्या स्वागतासाठी अवघी मुंबापुरी सज्ज झाली आहे. गिरगावपासून मुलुंड आणि बोरीवलीपर्यंतच्या नाक्यानाक्यावर भगव्या पतकांनी उंच कमानी उभारल्या असून, यात साखरेच्या गाठींनी गोडवा आणण्यास सुरुवात केली आहे. रविवारच्या बैठकांनी पाडव्याच्या नियोजनाचे सोपस्कर पूर्ण केले असतानाच शोभायात्रा मुंबई दुमदुमणार आहे.
दक्षिण मुंबईत गिरगावसह लगतच्या परिसरात पाडव्याचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. अवघ्या जगाचे लक्ष असलेल्या गिरगावची शोभायात्रा यंदाही तोच उत्साह घेऊन येणार असून, लालबागसह परळमध्ये रंगणारे सांस्कृतिक कार्यक्रम पाडव्यातील मुंबईला चारचाँद लावणार आहेत.
पूर्व आणि पश्चिम उपनगरातील कुर्ला, चेंबूर, घाटकोपर, मुलुंडमध्ये निघणाऱ्या शोभायात्रांचे नियोजन पूर्ण झाले असून, बोरीवली, कांदिवली, मालाडसह गोरेगाव येथील भरगच्च कार्यक्रमांची पाडव्याची दैनंदिनी हाऊसफुल्ल केली आहे. पाडव्याच्या शोभायात्रा यंदा उत्साह, जल्लोषाने मुंबईत रंग भरणार असल्याचे चित्र आहे. शिवसेना शाखा ८७ तर्फे हनुमान टेकडी सांताक्रुझ पूर्व येथे शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
स्वागतयात्रा - दशकपूर्ती वर्षातील मुद्राची तयारी... दशकपूर्ती वर्षातील मुंबईतील मुद्रा संस्थेची यंदाची नववर्ष स्वागतयात्रा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. या स्वागतयात्रेत सात वर्षांच्या चिमुरडीपासून ६० वर्षांच्या आजींपर्यंत विविध वयोगटांतील महिला सहभागी होतात. यात डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षिका, उद्योजिका यांचा समावेश असतो. राहुल शेरकर यांनी कोरिओग्राफ केलेल्या लेझीमच्या ठेक्यावर सध्या मुलुंड पूर्व येथील राजे संभाजी मैदानात स्वागत यात्रेची तालीम सुरू आहे.
गिरणगाव आणि ऐतिहासिक देखावे गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठान हिंदू नववर्ष शोभायात्रेत ऐतिहासिक देखावे साकारणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित संकल्पना घेऊनच गिरणगावकर सहभागी होणार आहेत. सकाळी ७ वाजता स्वामी समर्थ मठ परळ रेल्वे वर्कशॉप येथून शोभायात्रेस प्रारंभ होईल. दुपारी १२पर्यंत ही शोभायात्रा चिंचपोकळी दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ- गिरणगावचा राजा-डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग-जयहिंद (मुक्ता) सिनेमासमोर सांगता होईल.
सणवार ही संकल्पना कुर्ला पश्चिमेकडील वाडिया इस्टेट येथे सर्वप्रथम शोभायात्रेला आरंभ करणाऱ्या हिंदू नववर्ष स्वागतयात्रा समितीच्या वतीने यंदाही पाडव्यानिमित्त शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदू सणवार अशी संकल्पना आहे. पहाटे शोभायात्रा सोनापूर लेनमधून सुरू होईल आणि वाडेश्वर मित्रमंडळाच्या पटांगणात संपेल.
साडेतीन शक्तिपीठ प्रजासत्ताकदिनी दिल्लीतील कर्तव्यपथावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारा साडेतीन शक्तिपीठ यावरील चित्ररथ यावर्षी यात्रेतील विशेष आकर्षण असणार आहे.
ढोल पथक गिरगाव ध्वजपथक, गिरगावचा आवाज म्हणून ओळखले जाणारे गजर ढोल पथक तसेच मुंबईतील मोरया ढोल पथक सहभागी होणार आहेत.
गिरगावचा पाडवागिरगावातील फडके श्री गणेश मंदिरापासून ‘हिंदू नववर्ष स्वागत यात्रा’अर्थात ‘गिरगावचा पाडवा’ जल्लोषात साजरा केला जाणार आहे. ‘स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान’ आयोजित यात्रेचे हे २१वे वर्ष आहे. या वर्षीची यात्रा समर्थ भारत – विश्वगुरु भारत या संकल्पनेवर आधारित आहे. यात्रेचा प्रारंभ सकाळी ८ वाजता गिरगावातील फडके श्री गणेश मंदिरापासून गुढी पूजनाने होईल.