'मुंबईच तंत्रज्ञानाची राजधानी हे पुन्हा सिद्ध झालं', फडणवीसांनी सांगितलं 'ग्लोबल टेक हब'चं महत्त्व!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 17:21 IST2025-02-28T17:19:48+5:302025-02-28T17:21:46+5:30
मुंबईत आज आशियातील सर्वात मोठ्या AI इव्हेंटचं आयोजन यशस्वीरित्या पार पडलं आणि मुंबईच तंत्रज्ञानाची राजधानी असल्याचं आज पुन्हा एकदा सिद्ध झालं, असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

'मुंबईच तंत्रज्ञानाची राजधानी हे पुन्हा सिद्ध झालं', फडणवीसांनी सांगितलं 'ग्लोबल टेक हब'चं महत्त्व!
मुंबईत आज आशियातील सर्वात मोठ्या AI इव्हेंटचं आयोजन यशस्वीरित्या पार पडलं आणि मुंबईच तंत्रज्ञानाची राजधानी असल्याचं आज पुन्हा एकदा सिद्ध झालं, असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. बीकेसीमध्ये आयोजित 'मुंबई एआय विक' कार्यक्रमावेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती देताना फडणवीसांनी यावेळी काही महत्वाच्या घोषणा देखील केल्या.
राज्य सरकारने Meta कंपनीसोबत करार केला असून आता WhatsApp गव्हर्नन्सवर काम केलं जाणार आहे. ज्यामध्ये नागरिकांना राज्य सरकारच्या एकूण ५०० सेवा आता व्हॉट्सअॅपवर उपलब्ध होणार आहेत, असं फडणवीस यांनी सांगितलं. याआधी मुंबई मेट्रोचं तिकीट जेव्हा व्हॉट्सअॅपवर आणलं तेव्हा त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं आम्हाला दिसून आलं. याचाच बोध घेऊन राज्य सरकारच्या वेगवेगळ्या सुविधा नागरिकांना व्हॉट्सअॅपवरच उपलब्ध होतील असा करार करण्यात आला असल्याचं फडणवीस म्हणाले.
मुंबईत MPCI चं ग्लोबल हब होणार
"ज्यांनी UPI तयार केलं आहे अशा MPCI चं ग्लोबल हब हे मुंबईत होणार असून त्यासाठी जागा देण्याचा अंतिम करार आज झाला. जगातला सगळ्यात मोठा टेक्नोलॉजिकल पेमेंट गेटवे या कंपनीनं तयार केला आहे. ज्याची सेवा जगातील ८० देश घेत आहेत. अशा कंपनीचं ग्लोबल हेडक्वार्टर मुंबईमध्ये तयार करण्यासाठी आज आम्ही त्यांना जागेचे कागदपत्र सुपूर्द केले आहेत", असं फडणवीस यांनी जाहीर केलं. मुंबईसाठी टेक्नोलॉजी हब म्हणून ही सर्वात मोठी घोषणा असल्याचंही ते म्हणाले.