मुंबई: संक्रातीनंतरच्या आठवड्यात राज्यभरातील किमान तापमानाचा पारा सरासरी १५ अंशाच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तविला आहे. त्यामुळे उद्यापासून सुरु होणा-या आठवड्यात थंडीत राज्यातला मुक्काम कायम राहणार असतानाच मुंबईकरांना मात्र बदलत्या हवामानामुळे उन्हाचे चटके बसत आहेत. मुंबईचे कमाल तापमान ३३ तर किमान तापमान २२ अंश नोंदविण्यात आले असून, हवामान बदलामुळे मुंबईकरांना गरम होत असल्याचे चित्र आहे.
दक्षिण भारतातील हिवाळी पावसाचा हंगाम १५ जानेवारीला आटोपण्याची शक्यता आहे. तेथील मान्सून बाहेर पडला की महाराष्ट्रात थंडीसाठी पूरकता वाढते. उत्तर भारतात थंडीची तीव्रता कमी आहे. म्हणून महाराष्ट्रात कडाक्याच्या ऐवजी साधारण थंडी जाणवेल. थंडी संक्रांतीदरम्यान जाणवणार असली तरी १४ पर्यंत महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान १८ म्हणजे सरासरीपेक्षा ४ ने अधिक तर दुपारचे कमाल तापमान ३० म्हणजे सरासरीइतके असु शकते, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. धुके का आहे?पंजाब, हरियाणा, राजस्थानच्या काही भागात सकाळच्या वेळी धुक्याची चादर तर काही भागात अति नव्हे पण थंडीची लाट जाणवत आहे. म्हणूनच खान्देशात सकाळच्या वेळी सध्या धुके जाणवत आहे. किमान तापमान अंश सेल्सिसमध्ये
- अहमदनगर १५.४
- छत्रपती संभाजी नगर १५.६
- जळगाव १६.८
- कोल्हापूर १८.२
- महाबळेश्वर १६.६
- मालेगाव १७.६
- मुंबई २२
- नांदेड १८.२
- नाशिक १५.७
- धाराशीव १९.४
- परभणी १७.३
- रत्नागिरी २०.२
- सांगली १६.९
- सातारा १५.५
- सोलापूर २०.९