Join us  

मुंबई देशातील सर्वात महागडे शहर, तर इस्लामाबाद जगात सर्वात स्वस्त; यादीत अव्वल कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2024 12:53 PM

जगातील सर्वात महागड्या शहरांची यादी 'मर्सर'च्या कॉस्ट ऑफ लिव्हिंग सिटी २०२४ च्या अहवालातून जाहीर करण्यात आली आहे.

मुंबई

जगातील सर्वात महागड्या शहरांची यादी 'मर्सर'च्या कॉस्ट ऑफ लिव्हिंग सिटी २०२४ च्या अहवालातून जाहीर करण्यात आली आहे. हाँककाँग, सिंगापूर आणि झुरिच ही राहण्याच्या दृष्टीकोनातून जगातील सर्वाधिक महागडी शहरं ठरली आहेत. गेल्या वर्षापासून या तीन शहरांनी क्रमवारी कायम राखली आहेत. तर राहणी खर्चाच्या बाबतीत जगातील सर्वात स्वस्त शहरांमध्ये इस्लामाबाद, लागोस आणि अबूजा शहरांचा समावेश आहे. 

भारतात मुंबई सर्वात महागडं शहर ठरलं आहे. तर जागतिक पातळीवर मुंबईचा क्रमांक १३६ वा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईच्या क्रमवारीत चक्क ११ स्थानांची वाढ झाली आहे. दिल्लीचा क्रमांक १६५ वा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दिल्लीच्या क्रमवारीत ४ स्थानांची वाढ झाली आहे. चेन्नई १९५ आणि बंगळुरू १८९ स्थानावर आहे. हैदराबादचा क्रमांक २०२ वा आहे. पुणे २०५ आणि कोलकाता २०७ व्या क्रमांकावर आहे. 

'मर्सर'च्या कॉस्ट ऑफ लिव्हिंग सिटी २०२४ च्या अहवालात एकून २२६ शहरांचा अभ्यास केला गेला. यात घर, वाहतूक, अन्न, कपडे आणि मनोरंजन यांसारख्या २०० हून अधिक वस्तूंच्या खर्चाचे मूल्यांकन करण्यात आलं आहे. सर्वेक्षणानुसार महागाई, विनिमय दरातील तफावत, आर्थिक तसेच भू-राजकीय अस्थिरता आणि वाढता संघर्ष यांसारख्या अनेक घटकांनी राहणीमानाचा खर्च वाढण्यास हातभार लावला आहे.

हाँगकाँग यादीत अव्वल स्थानी का?हाँगकाँगमध्ये महागडी घरं, उच्च वाहतूक खर्च आणि महागड्या वस्तू आणि सेवांमुळे राहणीमान खर्च जास्त आहे, असे सर्वेक्षणात दिसून आले आहे. तर चलनाच्या अवमूल्यनामुळे इस्लामाबाद, लागोस आणि अबुजा येथे राहण्याचा खर्च कमी झाला, असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. 

जगातील महागडी शहरं कोणती?युरोपियन शहरं टॉप 10 सर्वात महागड्या शहरांमध्ये आहेत. लंडन ८ व्या, कोपनहेगन (११), व्हिएन्ना (२४), पॅरिस (२९) आणि ॲमस्टरडॅम (३०) व्या क्रमांकावर आहे. दुबई हे १५ व्या क्रमांकावर असून आंतरराष्ट्रीय कर्मचाऱ्यांसाठी मध्यपूर्वेतील सर्वात महागडं शहर आहे, तर दक्षिण अमेरिकेत, उरुग्वे हे ४२ व्या क्रमांकावर आहे. उत्तर अमेरिकेत, न्यूयॉर्क शहर या यादीत ७ व्या क्रमांकावर आहे.

टॅग्स :मुंबईपाकिस्तान