Join us

मुंबई आली हाकेच्या अंतरावर! मुंबईपासून कोणती शहरे, किती तासांच्या अंतराने जवळ आली?

By सचिन लुंगसे | Published: April 09, 2023 5:58 AM

आर्थिक राजधानी मुंबईला देशभरासह राज्यभरातील प्रमुख शहरांशी जोडण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर विविध रस्ते, रेल्वे, मेट्रो आणि जलप्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.

आर्थिक राजधानी मुंबईला देशभरासह राज्यभरातील प्रमुख शहरांशी जोडण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर विविध रस्ते, रेल्वे, मेट्रो आणि जलप्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यातील निम्मे प्रकल्प मार्गी लागले आहेत, तर निम्मे मार्गी लागत आहेत. यात दिल्ली - मुंबईसह मुंबई - नागपूरसारखा समृद्धी महामार्ग मैलाचा दगड ठरणार आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक मुंबईचा चेहरामोहरा बदलणार आहे. विशेषत: या सगळ्या प्रकल्पांमुळे प्रवासाचा वेग निम्म्यावर येईल. मुंबई राज्यासह देशभरातील शहरांशी वाहतुकीच्या दृष्टिकोनातून आणखी जवळ येणार आहे.

मुंबई ते दिल्ली : १२ तासमुंबई ते दिल्ली हा महामार्ग १,३८६ किमी लांब आहे. देशातील हा सर्वांत लांब महामार्ग आहे. मुंबई ते दिल्ली अंतर कापण्यासाठी २४ तासांचा अवधी लागतो; मात्र या एक्स्प्रेस वेचे काम पूर्ण झाल्यानंतर हेच अंतर अवघ्या १२ तासांत कापले जाणार आहे. ९८ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च करून हा मार्ग बांधला जाईल. ९ मार्च २०१९ रोजी दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाची पायाभरणी करण्यात आली. हा प्रकल्प जून २०२४ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.मुंबई ते अहमदाबाद : ३ तासमुंबई ते अहमदाबाद असा ५०८.१७ किलोमीटर लांबीचा हायस्पीड रेल्वे प्रकल्प (बुलेट ट्रेन) असून, यासाठी १ लाख ८ हजार कोटी खर्च आहे. सध्या हे अंतर पार करण्यासाठी ६ तास लागतात. प्रकल्प पूर्ण झाल्यावर ३ तास लागतील. प्रकल्पातील अहमदाबाद ते वापी ३५० किलोमीटरचा मार्ग २०२७ किंवा २०२८ मध्ये पूर्ण होऊन तो सेवेत येईल. त्याआधी या टप्प्यातील सुरत ते बिलिमोरा मार्ग २०२६ पर्यंत सेवेत आणण्याचे उद्दिष्ट आहे.मुंबई ते नागपूर : ८ ताससमृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी असा ५३० किलोमीटरचा पहिला टप्पा ११ डिसेंबर रोजी सुरू करण्यात आला. ५५ हजार कोटींच्या समृद्धी मार्गाचे डिझाइन स्पीड १५० किमी प्रती तास आहे. या मार्गाची एकूण लांबी ७०१ किमी आहे. या मार्गावरून १०० किमी प्रती तास वेगाने वाहन गेल्यावर मुंबईपासून शिर्डी अंतर अवघ्या दोन तासांत पार होईल. मुंबई ते नागपूर अंतर कापण्यासाठी १४ तास लागतात. समृद्धी महामार्गामुळे हे अंतर पार करण्यासाठी ८ तास लागतील. महामुंबई रिंगरूट : विना सिग्नल मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, शिवडी-वरळी उन्नत मार्ग, विरार अलिबाग कॉरिडॉर, मीरा भाईंदर कोस्टल रोड या प्रकल्पांद्वारे येत्या दहा वर्षांत महानगर क्षेत्रात रिंगरूट तयार होणार असून, यावरून विना सिग्नल प्रवास करता येईल.

मुंबई ते पुणे सुपरफास्टमुंबई ट्रान्स हार्बर लिंक (शिवडी - न्हावा शेवा) नोव्हेंबरपासून खुला करण्यात येईल. या प्रकल्पाची किंमत १७,८४३ कोटी आहे. ट्रान्स हार्बर लिंकवरून येणाऱ्या वाहतुकीस शिवडी वरळी उन्नत मार्गाने वरळीपर्यंत पोहोचून वांद्रे - वरळी सागरी सेतूने वांद्रे येथून पश्चिम उपनगरांकडे जाता येईल. या पुलामुळे मुंबई ते नवी मुंबई २० मिनिटांत गाठता येईल, तर मुंबई ते पुणे प्रवास ९० मिनिटांत होईल.

वर्सोवा ते विरार : ४५ मिनिटेमुंबईतून विरारला पोहोचण्यास दोन तास लागतात. मात्र, वर्सोवा-विरार सी लिंक पॉईंटमुळे हे अंतर कमी होणार आहे. मुंबईतून केवळ ४५ मिनिटांत विरारला पोहोचता येईल. वर्सोवा-विरार या सुमारे ४२.७५ किमी लांबीचे वर्सोवा ते वसई आणि वसई ते विरार या दोन टप्प्यांत काम होणार आहे.

टॅग्स :मुंबई