मुंबई: अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी सगळ्या यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने जवळपास मुंबई पोलिस दलाकडून आठ अपर पोलिस आयुक्त २५ पोलिस उपायुक्त, ४५ सहायक पोलिस आयुक्त यांच्यासह २८६६ पोलिस अधिकारी व १६२४० पोलिस अंमलदार बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेले आहेत. तसेच ईद-ए- मिलादच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी खबरदारी घेतलेली आहे.
गिरगाव, दादर, जुहू मार्वे, आक्सा या प्रमुख विसर्जन स्थळांसह 1७३ नैसर्गिक ठिकाणांव्यतिरिक्त १६२ कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रत्येक ठिकाणी कायदा व सुव्यस्थेच्या दृष्टीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रत्येक विसर्जनाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून प्रमुख विसर्जनाच्या ठिकाणी ध्वनिक्षेपक यंत्रणेसह तात्पुरते नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. तसेच वाहतूक पोलिस विभागाकडून वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यासाठी चोख उपाययोजना करण्यात आली आहे
पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती, सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. मुंबई पोलिस दलाकडून ८ अपर ४५ सहायक पोलिस आयुक्त यांच्यासह २८६६ पोलिस अधिकारी व १६२४० पोलिस अंमलदारांच्या दिमतीला महत्त्वाच्या ठिकाणी ३५ एस.आर.पी.एफ. प्लाटून क्यूआरटी टीम, आरएएफ कंपनी, होमगार्डस याची नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान, भाविकांनीही यंत्रणांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
गणसेवक आणि पोलिस मित्रांचा पुढाकार
बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या पुढाकाराने, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणसेवकाना मुंबई पोलिसांकडून जनजागृती प्रशिक्षण देण्यांत आले आहे. या माध्यमातून किमान एक लाख गणसेवक तयार होतील, असा दावा समितीने केला आहे. गणसेवकांबरोबर पोलिस मित्रही चंदोबस्तासाठी सज्ज झाले आहेत.
विशेषतः गिरगाव चौपाटी परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात असणार असल्याची माहिती अभियान विभागाचे पोलिस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी दिली आहे. यासोबतच पोलिस नियंत्रण कक्षातून मुंबईतील पाच हजार सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिस सर्व घडामोडीवर लक्ष ठेवून असणार आहेत. शिवाय फिरते नियंत्रण कक्षही महत्वाच्या ठिकाणी तैनात असणार आहेत.
महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भयाचा आधार
महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया पथकही २४ तास कार्यरत आहे. बाप्पाच्या गीत चोरी तसेच छेडछाडीच्या घटना घडू म्हणून साध्या गणवेशातील महिला पोलिस छुप्या कॅमेऱ्यांसह तैनात राहणार आहेत