मुंबई हीच रिअल इस्टेट! एक लाख कोटींची उलाढाल; २०२३ मध्ये होणार विक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 05:52 AM2023-09-17T05:52:43+5:302023-09-17T05:53:18+5:30
देशाची ४० टक्के उलाढाल एकट्या मुंबईत
मनोज गडनीस
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईने अनेक क्षेत्रांत आपला दबदबा निर्माण केल्यानंतर आता चालू वर्षात देशाच्या बांधकाम क्षेत्रात सर्वात मोठा उच्चांक नोंदवण्यासाठी मुंबई सज्ज झाली आहे. २०२३ वर्षाअखेरपर्यंत मुंबईच्या बांधकाम क्षेत्रात तब्बल एक लाख कोटी रुपयांची उलाढाल होणार असल्याचा अंदाज नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नरेडको) व जेएलएल या बांधकाम क्षेत्रातील दोन दिग्गज कंपन्यांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालात व्यक्त केला आहे. तर, २०३० पर्यंत मुंबईच्या बांधकाम क्षेत्रात तब्बल दाेन लाख कोटींचा टप्पा पार होईल, असे भाकीतदेखील वर्तविण्यात आले आहे.
‘अनलॉकिंग ऑपर्च्युनिटीज विथ इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट’ या नावाने हा अहवाल तयार करण्यात आला असून मुंबईत सध्या मध्यम आकाराच्या प्रकल्पात सर्वाधिक उलाढाल होताना दिसत आहे. तर, आलिशान व प्रीमियम प्रकल्पांतही घरे घेण्याचा ट्रेण्ड रुजताना दिसत आहे. सध्याच्या घरापेक्षा मोठे घर घेण्याचा ट्रेण्ड हा महत्त्वाचा घटक आहे.
३५० एकर जागेवर बांधकाम सुरू
गेल्या १८ महिन्यांत अनेक विकासकांनी मुंबई व पुणे परिसरात एकूण ३५० एकर जागेची खरेदी केली आहे. या जमिनीवर प्रामुख्याने निवासी संकुले बांधण्यात येत आहे. याद्वारे ५० हजार कोटी रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज आहे.
एमएमआरमधील चार विभाग महत्त्वाचे
या अहवालानुसार, मुलुंड व परिसराला सध्याच्या वांद्रे परिसरासारखे महत्त्व येईल. २०२३ पर्यंत मुलुंडमध्ये प्रति चौरस फूट भाव ५० हजार रुपयांपर्यंत पोहोचेल. ठाणे-भिवंडीदरम्यान सुरू असलेल्या बांधकामांना ठाण्यातील माजिवडा परिसरासारखा भाव येईल.नवी मुंबईतील पुष्पक नगर परिसरात घरांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढेल. शिवडी व वडाळा हे दोन्ही भाग वरळीप्रमाणे विकसित होऊन त्या भावांशी स्पर्धा करतील.
निवासी बांधकामाच्या खरेदीसाठी पसंती कायम
देशाच्या बांधकाम क्षेत्रात होणाऱ्या उलाढालीपैकी एकट्या मुंबईचा वाटा हा ४० टक्के आहे. निवासी; तसेच व्यावसायिक बांधकामाच्या खरेदीसाठी आजही मुंबईला पसंती मिळत असल्याचे दिसून येत आहे.
ऑफिसजवळ घर हवे
गेल्या काही वर्षांत ग्राहकांची क्रयशक्ती वाढल्यामुळे कार्यालयाच्या जितक्या जवळ घर घेता येईल; तितक्या जवळ घर घेण्याचा ट्रेण्ड मुंबईत रुजताना दिसत आहे. असे अगदी शक्य झाले नाही; तर मेट्रो किंवा नव्याने उभारल्या जाणाऱ्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या जवळ घर घेण्याचाही ट्रेण्ड रुजत आहे.
५० टक्क्यांनी प्रवासाचा वेळ कमी होणार
मुंबईत सध्या मेट्रो व अन्य पायाभूत सुविधांची जी कामे सुरू आहेत, ती पूर्ण झाल्यानंतर सामान्य मुंबईकरांच्या प्रवासाच्या वेळेत किमान
५० टक्क्यांनी बचत होईल, असा अंदाज अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.